केंद्रीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय पुरस्कार

0
14

नवी दिल्ली, 19 : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय ग्रामीण विकास,पंचायतीराज व पेयजल मंत्रालयाच्या वतीने वार्षीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मंत्रालयाअंतर्गंत देशभर राबविण्यात येणा-या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या राज्यांच्या विविध संस्थांना यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव, सचिव
अमरजीत सिन्हा यावेळी उपस्थित होते.  विविध श्रेणींमध्ये  यावेळी पुरस्कार वितरीत करण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे सचिव व्ही.आर.नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
 प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) राज्याला 5 पुरस्कार
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत(ग्रामीण) लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी,  उपग्रहाद्वारे निरिक्षण (जिओ टॅगींग) आणि घरकुलांना मंजुरी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला असून आज सुवर्ण पदकाने राज्याचा गौरव करण्यात आला.  राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता आणि ग्रामीण गृह निर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे
यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातून सातारा जिल्हयाची निवड करण्यात आली असून सातारा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या योजनेची सर्वचक्षेत्रात  प्रभावी अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम स्थानावर राहीले आहे. या उपलब्धीसाठी सातारा जिल्हयाला सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले. सातारा जिल्हयातील कराडचे गट विकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधीचे वितरण करणे व
घरकुलांना मंजुरी देण्यात उत्तम कार्य केल्याबद्दल राज्याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण गृह निर्माण विभागाच्या उपसंचालक विना सुपेकर  यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेअंतर्गत गवंडी प्रशिक्षण देण्यात देशात महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर असून यावेळी कांस्य पदकाने राज्याला सन्मानीत करण्यात आले. ग्रामीण गृह निर्माण विभागाचे मुख्य अभियंता एस.आर.मालपानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गंत राज्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी हरित तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी  महाराष्ट्राला  तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे सचिव व्ही.आर.नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीतंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून योगदान देणा-या विविध राज्यांतील संस्थांचा यावेळी विविध श्रेणींमध्ये सत्कार करण्यात आला. तंत्रज्ञान विभागातील प्रेरणादायी पुरस्कारासाठी नवी मुंबईतील रामराव आदिक तंत्रज्ञान संस्थेचा यावेळी गौरव करण्यात आला. सार्थक लांगडे आणि त्यांच्या चमुने हा पुरस्कार स्वीकारला.