तुमसरात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

0
20

तुमसर दि.30: तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत तथा परिसरात अवैध बांधकाम व अतिक्रमणावर तुमसर नगर परिषदेने गुरूवारी बुलडोजर चालविला. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. नव्याने रूजू झालेल्या महिला मुख्याधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळपासूनच मोर्चा सांभाळला होता. पोलीस बंदोबस्त याप्रसंगी चोख होता. शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढल्या जाणार आहे. अतिक्रमणाच्या कारवाई दरम्यान एक दोन नगरसेवक वगळता कुणीच फिरकले नाही.

तुमसर शहरात मागील काही वर्षापासून अतिक्रमण तथा अवैध बांधकामात वाढ झाली आहे. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाने डोके वर काढले होते. आठवडी बाजाराच्या दिवशी नागरिकांना पायी सुद्धा चालता येत नाही. येथील रस्ते दिवसेंदिवस अरूंद होत चालले होते. तुमसर नगरपरिषदेसमोरील बुक डेपो चाळ, कपडा मार्केट, फळा बाजार, जूने गंग बाजार परिसरात गुरूवारी अतिक्रमणाचा बुलडोजर चालला. सकाळी ७.३० पासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. शहरातील सर्वच अतिक्रमण तथा अवैध बांधकामावर कारवाई करावी, असा सूर शहरात उमटत होते.

मुख्याधिकारी अर्चना मेंढे, पोलीस निरीक्षक आर.आर. नागरे, नायब तहसीलदार एन.पी. गौंड तथा नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांनी सकाळी ६.३० वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात केली. शहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीस अडथडा ठरणाऱ्या अतिक्रमण तथा अवैध बांधकाम पाडण्याचे संकेत मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी दिली. अतिक्रमणाची कारवाई पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मुख्याधिकाऱ्यांनी येथे काही दिवसापूर्वी व्यावसायीकांची बैठक बोलाविली होती. त्यात अतिक्रमण तथा अवैध बांधकाम हटविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने गुरूवारी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.