हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची 28 कोटींची कामे पूर्ण

0
10

हिंगोली दि.9:- जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील आर्थिक वर्षातील मंजूर झालेल्या कामांवर आतापर्यंत तब्बल 28 कोटी रुपयांची अडीच हजार कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात आता मोठा पाऊस झाल्यास कोट्यावधी लिटरचा पाणीसाठा होणार आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, भुजल सर्वेक्षण विभाग, वन विभाग, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा), कार्यकारी अभियंता (जलसंधारण), कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायत आदी प्रमुख यंत्रणांमार्फत कामे केली जात आहेत. यामध्ये मातीनाला बांध, आर्दन स्ट्रक्‍चर, लुजबोल्डर स्ट्रक्‍चर, रिजार्ट शॉफ्ट, केटी वेअर दुरुस्ती, सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे. या योजनेमधे जास्तीत जास्त कामे पूर्ण होऊन जिल्हयात मुबलक पाणीसाठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन दोन हजार 899 कामांना मंजुरी दिली होती. सदर कामे आकरा हजार हेक्‍टर क्षेत्रावर घेण्यास मान्यता दिली होती.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात अडीच हजार कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आता पर्यंत 28 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामधे कृषी विभागाच्या सुमारे दोन हजार कामांवर आकरा कोटी 54 लाख रुपये, भुजल सर्वेक्षणच्या 71 कामांवर 22 लाख रुपये, वन विभागाच्या सव्वा तीनशे कामांवर साडेआठ कोटी रुपये, पाटबंधारे विभागाच्या 28 कामांवर तीन कोटी 17 लाख रुपये, लघुसिंचन विभागाच्या साठ कामांवर दोन कोटी रुपये, ग्रामपंचायतीच्या 42 कामांवर एक कोटी 72 लाख रुपये खर्चाचा समावेश आहे.