काँग्रेसचे 6 खासदार 5 दिवसांसाठी निलंबित, लोकसभेत कागदे फेकल्याने अध्यक्षांनी उचलले पाऊल

0
3

नवी दिल्ली दि. 24 – लोकसभेत सोमवारी बोफोर्स प्रकरणावर गोंधळ झाला. या गोंधळात काँग्रेस खासदारांनी सदनात कागद फेकले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी याचा विरोध केला. नंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी 6 सदस्य – गौरव गोगोई, के. सुरेश, अधीर रंजन चौधरी, रंजीत रंजन, सुश्मिता देव आणि एम.के. रावघवन यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.
लोकसभेत भाजपा खासदारांनी बोफोर्सचा मुद्दा उपस्थित केला होता. बोफोर्स प्रकरणी 2005 नंतरची सीबीआय तपासणी करण्यात यावी अशी मागणी भाजपा खासदारांनी यावेळी केली. यावर काँग्रेस खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मिनाक्षी लेखी यांनीदेखील बोफोर्सचा मुद्दा उपस्थित करत सांगितलं की, ‘काँग्रेस पुरलेले मृतदेह बाहेर काढू नका असं म्हणेल, पण जोपर्यंत ते व्यवस्थित पुरले जात नाहीत तोपर्यंत ते भूत बनून फिरत राहतील’.एकीकडे काँग्रेस जमाव हल्ले आणि गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्यांवर चर्चेची मागणी करत असताना भाजपा खासदारांनी बोफोर्सवर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. बोफोर्सच्या मुद्द्यावर काँग्रेसने सभागृहात जोरदार गोंधळ घातला. याचवेळी खासदारांनी पेपर फाडून सुमित्रा महाजन यांच्या दिशेने भिरकावले. यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी खासदारांवर कारवाईची मागणी केली. खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 2.30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. यानंतर खासदारांवर पाच दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.