नवरात्रीपुर्वी कर्जमाफीसाठी शिवसेनेचा सोमवारी राज्यव्यापी शेतकरी मोर्चे-ना.दिवाकर रावते

0
15

गोंदिया,दि.09(खेमेंद्र कटरे)- शिवसेना हा निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणुका येतात आणि जातात. शिवसेना हा निवडणुकीकरिता असणारा पक्ष नाही. कार्यकर्त्याचा पक्ष आहे. सत्तेत आहे किंवा नाही याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही.जनतेचा आवाज सत्ताधा-यांपर्यत पोहोचविण्याकरीता आम्ही सत्तेत आहोत.राज्यातील सर्व शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ नवरात्रोत्सवापुर्वी मिळावे यासाठी शिवसेनेच्यावतीने येत्या सोमवारला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेनेचे पुर्व विदर्भ संपर्क नेते ना. दिवाकर रावते यांनी आज शनिवारला(दि.09) आयोजित पत्रकार परिषेत दिली.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा अध्यक्ष मुकेश शिवहरे,राजकुमार कुथे,उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे,सुनिल लांजेवार,दुग्ध संघाचे संचालक रुपेश कुथे  आदी पदाधिकारी उपस्थित होते.माहिती देतांना रावते म्हणाले की पावसाअभावी पिकांची स्थिती नाजुक झाली आहे.विदर्भ व मराठवाड्या दुष्काळी परिस्थिती असून खरीपाचे पिक गेलेले आहे.पुर्व विदर्भातील गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान पिकाची वाईट परिस्थिती असून जमिनिला भेगा पडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.या जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्हा दुष्काळग्रस्तसंबधी मुख्यमंत्र्याकडे माहिती दिली अाहे.सध्याची परिस्थिती बघता मुख्यमंत्री नक्कीच या दोन्ही जिल्ह्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतील असे सांगत शिवसेना शेतकरी कर्जमाफींच्या संदर्भात आधीपासूनच स्पष्ट भूमिका घेऊन असून जून 2016 नव्हे तर जून 2017 पर्यंतच्या सर्व शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवे अशी आमची भूमिका आहे.आणि त्या समितीचा सदस्य म्हणून मी मांडली आहे.मुख्यमंत्री महोदयांनी आक्टोंबरपर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकर्यांना देऊ असे म्हटले असले तरी आमच्या पक्षाची भूमिका नवरात्रोत्सव सुरु होण्यापुर्वी शेतकर्यांनां कर्जमाफी मिळाली पाहिजे ही असल्यानेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी शेतकरी मोर्चे आयोजन करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना सत्तेत राहुनही शेतक-यांच्या समस्येची जाणीव सरकारला करून देत आहे. याकरीता रस्त्यावर उतरत आहे. पुढील महिन्यात रबीचा हंगाम सुरू होत असून शेतक-यांना अजुन खरीपाचे कर्ज मिळाले नाही. त्यामुळे या महिन्याचे शेवटी त्यांना कर्जमाफी करून नवीन कर्ज देण्याची मागणी करण्यात येणार आहे. ते कर्ज रबीच्या हंगामाकरीता शेतक-यांच्या कामी येणार आहे. शिवसेना प्रमुखांनी विदर्भात संघटना बांधणीची जबाबदारी सोपविली असून शिवसेना घरा-घरात पोहोचविणार असल्याचे ना. रावते यांनी सांगितले.

वेगळ्या विदर्भाला मात्र शिवसेनेचा आजही विरोध कायम

वेगळ्या विदर्भाबाबत बोलतांना रावते म्हणाले की,आमची आधीही वेगळ्या विदर्भाच्या विरोधात भूमिका होती तीच भूमिका आजही कायम आहे.विदर्भ हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग असून विदर्भाच्या प्रश्नामुळे विदर्भात शिवसेना मोठी होऊ शकली नाही असे नाही तर पक्ष संघटनेच्या बांधणीत कुठेतरी आम्ही कमी पडल्याने पाहिजे त्या प्रमाणात पक्ष वाढू शकला नाही.सिंचन व अनुशेषाच्या मुद्यावर वेगळ्या विदर्भाची मागणी व्हायची परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास व जलसंधारण मंत्री नितिन गडकरी यांच्या पुढाकाराने विदर्भाच्या सिंचनाचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार असल्याने सिंचनाचा प्रश्नच राहिला नसल्याचे म्हणाले.

10 हजार मदतनिधीमध्ये बँकानीच सरकारला दगा दिला

राज्यातील शेतकर्यांना राज्यसरकारने दिलेली कर्जमाफी ही आजपर्यंतची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असून या कर्जमाफीचा लाभ मिळण्यापुर्वी खरीपाच्या कामासाठी शेतकर्यांना तात्पुरती 10 हजाराची मदत तत्काळ देण्यासंबधी राज्यसरकारने निर्णय घेतला.परंतु त्या निर्णयाची योग्य अमलंबजावणी बँकांनी न केल्याने शेतकर्यांना त्याचा लाभ मिळू शकला नसून सर्वच बँकानी याप्रकरणी सरकारला दगा दिल्याची टिका ना.दिवाकर रावते यांनी केली.