‘जलयुक्त’चे ‘जलतज्ज्ञां’कडून कौतुक

0
11

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्रात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे भरभरुन कौतुक करुन यात आणखी लोकसहभाग वाढवावा, अशी सूचना जलबिरादरीचे संस्थापक जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी आज येथे केली.जलयुक्त शिवार कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासंदर्भात मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी आज मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह हे आवर्जून उपस्थित होते.यावेळी राज्य शासनाने राबविलेल्या या योजनेच्या माहितीचे तसेच राबविलेल्या अभिनव उपक्रमांचे सादरीकरण श्री. राजेंद्र सिंह यांच्यासमोर करण्यात आले. तसेच राज्य शासनाने राबविलेल्या पाणलोट क्षेत्राचे गाव नकाशे तयार करून ग्रामपंचायतमध्ये प्रदर्शित करण्याच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली.

जलयुक्त शिवार योजना राबविताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात श्री. राजेंद्र सिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असून लोकांच्या फायद्यासाठी व निसर्गाच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार सारख्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे राजेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कामे झाली आहेत. नाला खोलीकरण, गॅबियन बंधाऱ्याचा प्रयोग असे अनेक वेगवेगळे प्रयोगही झाले आहेत. जलयुक्तची कामे करत असताना नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबरोबरच जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेत अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुढील काळात यावर भर देण्यात येईल, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.या बैठकीस नंदूरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जलबिरादरीचे राज्याचे कार्याध्यक्ष किशोर धारिया, जलसाक्षरता केंद्राचे श्री. पांडे, जलअभ्यासक डॉ. स्नेहल धोंडे, कार्यकारी अभियंता प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.