आत्महत्या रोखण्यासाठी उत्पन्न दुपटीने वाढणार; मंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

0
6
राहुरी,दि.28(विशेष प्रतिनिधी)- आत्महत्या रोखण्यासाठी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी शेतीला जोडधंदा आवश्यक आहे. आघाडी सरकारच्या काळात कर्जमुक्तीची पध्दत गफलत करणारी ठरल्याने आमच्या सरकारने ऑनलाइन पध्दत आणली, असे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.महात्मा फुले कृषी विद्यापीठातील किसान आधार संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी फुंडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. के. पी. विश्वनाथा होते. कृषी प्रदर्शनास भेटी दिल्यानंतर हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या केंद्राचे उद््घाटन फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ते म्हणाले, हवामानाचा अंदाज चुकत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठी राज्यात कृषी मंडल स्तरावर स्वयंचलित २०५० हवामान केंद्र डिसेंबरपर्यंत उभे राहणार आहेत. या केंद्रातून पाऊस कधी पडणार, गारपीट, तसेच तापमानाची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. चांगल्या उत्पादनासाठी शेतीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य बिघडले की, जमिनीचा पोत बिघडतो. त्यासाठी मार्च २०१८ पर्यंत राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाणार अाहे, असे त्यांनी सांगितले. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून १५ दिवसांत कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुरीचे उत्पादन जास्त झाल्याने कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट सुरू झाली. मात्र, शासनाने तूरखरेदी केंद्र सुरू करून प्रत्येक जिल्ह्यात ५०० कोटींची तूर खरेदी केली. ऑक्टोबरपासून हमीभावाने उडीद मुगाची खरेदी सुरू होणार असल्याचे फुंडकर म्हणाले. जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले, कमी पाण्यात उत्पन्न देणारे वाण विद्यापीठातील शास्रज्ञांनी निर्माण करणे गरजेचे आहे.
शेतकरी आत्महत्या करतो, या विषयावर राज्यकर्त्यांनी चिंतन शिबिर घेणे आवश्यक अाहे. त्यासाठी वेगळे कृषी धोरण आणावे, अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. यावेळी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, आमदार शिवाजी कर्डिले, कुलगुरू डाॅ. विश्वनाथा यांनीही मनोगत व्यक्त केले.