भाजप सरकारविरुद्ध खोरिपाचे जनसंघर्ष अभियान: माजी आमदार उपेंद्र शेंडे

0
20
गडचिरोली ,दि.२९: भाजप सरकारच्या काळात दलित, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन व महिलांवर अत्याचार वाढत असून, महागाई व बेरोजगारी कमी करण्याबाबत हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका उत्तर नागपूरचे माजी आमदार व रिपब्लिकन पक्षाचे(खोरिपा)राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे यांनी केली.प्रेसक्लब भवनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.शेंडे बोलत होते. पत्रकार परिषदेला खोरिपाचे अतिरिक्त सरचिटणीस आर.पी.भिडे, प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवने, उत्तमराव गवई, सत्यजित खोब्रागडे, जीवन बागडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष माणिकराव तुरे, नामदेवराव खोब्रागडे, भोजराव वाकडे उपस्थित होते.

उपेंद्र शेंडे यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती दिनी २५ सप्टेंबरपासून सरकारविरुद्धच्या जनसंघर्ष अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया इत्यादी जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून, सभा व चर्चासत्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन व महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून, महागाई व बेरोजगारीने कहर केला आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दलित, आदिवासींना पदोन्नतीत आरक्षण नाकारले जात आहे. या सर्व प्रश्नांवर जनतेशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी दिली.