शहांची सभा; मंचावर येताच पाटीदारांनी फेकल्या खुर्च्या

0
9
अहमदाबाद,दि.02 –गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा भलेही झाली नसली तरी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही राज्यात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. दोघांचीही निवडणूक यात्रा पटेलबहुल सौराष्ट्रातून सुरू झाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच आठवड्यात ‘नवसर्जन गुजरात यात्रा’ काढली होती.पाटीदारांना वळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. राज्यात सुमारे २०% पाटीदार आहेत. भाजप, काँग्रेस दोघांकडेही, पाटीदार वगळता, सारखी म्हणजे ४२-४२ टक्के मते आहेत. पाटीदारांची दोन दशकांपासून भाजपला सत्तेत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे जन्मस्थान करमसद येथून ‘गुजरात गौरव यात्रा’ रवाना केली. त्यानंतर अमित शहांनी एका जाहीर सभेत संबोधित केले. शहा मंचावर येताच पाटीदार युवकांनी त्यांच्याविरोधात घोषणा देणे सुरू केले. त्यांनी खुर्च्याही फेकल्या. शहा यांना आधीही गुजरातमध्ये विरोध झाला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘भारतरत्न’ उशिरा दिल्याबद्दल अमित शहांनी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहा यांची ही सभा म्हणजे राहुल यांच्या सौराष्ट्र यात्रेला उत्तर मानले जात आहे. तीत त्यांनी पटेलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता भाजपने नाराज पटेल समुदायाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात पटेलांची संख्या २०% आहे. ते राज्यात १८२ पैकी ७३ जागांवर विजय-पराजयात निर्णायक भूमिका वठवतात.