दतोरा येथील कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

0
11

गोंदिया,दि.७ : गोंदिया तालुक्यातील दतोरा येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या फिडर कॅनॉलच्या बांधकामाची पाहणी नुकतीच जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय अभियंता आर.आर. चौधरी, शाखा अभियंता वासुदेव रामटेककर प्रामुख्याने उपस्थित होते.
सन २०१६-१७ मध्ये सदर काम जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आले. गावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या तलावाचे पाणी हे गावालगत असलेल्या मामा तलावात सोडण्यात आले. त्यामुळे या तलावातून सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली. गावातील पाण्याचे स्त्रोत बळकट होण्यास मदत झाली. नवीन तलाव ते गाव तलावपर्यंत ५३५ मीटर लांबीचा खुला कालवा आणि १६५ मीटर लांब भूमीगत पाईप लाईन टाकण्यात आली. त्यामुळे गावाजवळच्या तलावात मोठ्या प्रमाणात जलसंचय होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानातून हे नाविन्यपूर्ण काम झाल्यामुळे माजी सरपंच धनलाल कावळे, सुरजलाल महारवाडे, सुरेश मेंढे, मेघराज महारवाडे, दिनेश उके व ग्रामस्थांनी शासनाचे आभार मानले.