गुजरात विधानसभेचा बिगूल वाजला ९ आणि १४ डिसेंबरला होणार मतदान

0
12

नवी दिल्ली,दि.26(वृत्तसंस्था)- बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर तर दुसर्‍या टप्प्यात १४ डिसेंबरला मतदान होईल. १८ डिसेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी तर, दुसर्‍या टप्प्यात १४ जिल्ह्यातील ९३ जागांसाठी मतदान होईल.गुजरात विधानसभेचा कार्यकाळ २२ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अचलकुमार जोती यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
गुजरात निवडणुकीत ५0 हजार १२८ मतदान कें द्रांवर मतदान प्रक्रीया पार पडेल. या निवडणुकीत मतदान कें द्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाल्याचे जोती यांनी जाहीर केले. दोन टप्प्यात मतदान होणार असून ४ कोटी ३३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. १0२ मतदान कें द्रावरील सर्व कर्मचारी या महिला असतील. प्रत्येक उमेदवाराला प्रचारावर २८ लाख रुपयांपयर्ंतच खर्च करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर ९ डिसेंबर रोजी मतदान होईल. यामध्ये १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून यात १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगावर टीकाही झाली. गुजरातमधील निवडणूक नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरत आहे. त्यामुळेच होम ग्राऊंड टिकवण्यासाठी मोदींनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर आता निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. इंडिया टुडे समूह आणि अँक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये दोन तृतीयांश जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे समूह आणि अँक्सिस माय इंडियाने २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सर्वेक्षण केले होते.