महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर- नितीन गडकरी

0
24

नवी दिल्ली,दि. 26: भारतमाला योजनेअंतर्गत देशात 44 आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून यातील 12 कॉरिडोर महाराष्टातून जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशात भारतमाला योजनेअंतर्गत एकूण 65 हजार 400 किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार असून पहिल्या टप्प्यात  5 लाख 35 हजार कोटी रुपये खर्च करुन  34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन श्री नितीन गडकरी म्हणाले, देशात 26 हजार 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आर्थिक कॉरिडोरमध्ये असणार आहे, त्याबरोबर फिडर रुटस् राष्ट्रीय कॉरिडोर, आंतराष्ट्रीय सीमेवरील रस्ते, कोस्टल व पोर्ट मार्ग, एक्सप्रेस वे व जोड रस्ते असे एकूण 39 हजार 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश भारतमाला योजनेत करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाअंतर्गत 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्तेही तयार
करण्यात येणार आहेत, अशी माहिती  श्री गडकरी यांनी दिली.
महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर

भारतमाला योजनेअंतर्गत देशातील एकूण 44 आर्थिक कॉरिडोरपैकी 12 आर्थिक कॉरिडोर महाराष्ट्रातून जात आहेत. यामध्ये मुंबई–कोलकत्ता (1854 किमी),मुंबई-कन्याकुमारी (1619किमी), आग्रा-मुंबई(964 किमी),पुणे-विजयवाडा(906किमी), सुरत-नागपूर(593 किमी), सोलापूर-नागपूर (563 किमी), इंदोर-नागपूर (464 किमी), सोलापूर-बेल्लरी-गुटी (434 किमी), हैदराबाद-औरंगाबाद (427 किमी), नागपूर-मंडी दाबवली (387 किमी),सोलापूर-महबुबनगर (290 किमी), पुणे-औरंगाबाद (222 किमी) या कॉरिडोरचा
समावेश आहे. या आर्थिक कॉरिडोरची लांबी  8501 किलोमीटर इतकी आहे.महाराष्ट्रातून जाणा-या या आर्थिक कॉरिडोरमुळे आठ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाणार  आहे.

आर्थिक कॉरिडोर 16 जिल्ह्यातून जाणार,महाराष्ट्रात तीन रिंग रोड
महाराष्ट्रतून जाणा-या 12 आर्थिक कॉरिडोरमध्ये  मुंबई, ठाणे, नाशिक,औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर,जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या 16 जिल्ह्यचा समावेश आहे.वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील 28 शहरांमध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर,धुळे या शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात 9 मालवाहतूक तळ

देशात 24 मालवाहतूक तळ निवडण्यात आले असून  यामध्ये महाराष्ट्रातील 9 शहरे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी,मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे, अशी माहिती श्री गडकरी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.