बीएस्सी नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द!

0
14

गडचिरोली,दि.10ः-जिल्ह्यातील एका नामवंत संस्थेचे बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम बंद करण्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. त्यामुळे जिल्हाभरात शिक्षण क्षेत्रामध्ये कुजबुज सुरू आहे.विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरीता विद्यार्थिनींनी अशा बोगस संस्थेत कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य प्रकारे माहिती घेवून महाविद्यालयात प्रवेश घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाने शासन निर्णय क्र. एनयुआर २0१२/ प्र.क्र.0५/१२/शिक्षण- १ या विभागाने १२ ऑक्टोबर २0१७ ला मान्यता रद्दचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ कलम ७३ मधील तरतुदीनुसार विद्यापीठाने जिल्ह्यातील एका नामांकीत नर्सिंग कॉलेज संस्थेला कायम स्वरूपी असलंग्न केले असून शासनादेश १0/१0/२0१७ अन्वये संस्थेचे आवश्यकता प्रमाणपत्रही रद्द केलेले आहे. त्याअनुसरून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमामधील कलम ७४ (७) मधील तरतुदीनुसार या नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेले आवश्यकता प्रमाणपत्र व संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णय याव्दारे रद्द करण्यात आले आहे. तसेच सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सदर महाविद्यालय बंद करण्यात येत आहे, असे परिपत्रक शासनाने काढले आहे.
मागील अनेक वर्षापासून या नर्सिंग कॉलेजमध्ये संस्था चालकातर्फे विद्यार्थिनींचे मानसिक व शारीरिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थिनींनी पोलिस ठाणे, विद्यापीठ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, लोकप्रतिनिधींकडे दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सदर शिक्षण संचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात आली होती. या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात न जाण्याचे धोरणदेखील अवलंबिले होते. तसे पत्र विद्यापीठाला देखील पाठविण्यात आले होते. संपूर्ण जिल्हाभरात या महाविद्यालयाच्या दुष्कर्माच्या चर्चा रंगल्या होत्या. सदर संस्थाचालक विद्यार्थिनींकडून शिक्षणाव्यतिरिक्त स्वत:ची अनेक कामे करवून घेत होता. विद्यार्थिनींना परीक्षेमध्ये जास्त गुण देण्याचा बहाणा करून मानसिक व शारीरिक शोषण करीत होता.
सदर प्रकरणाची तक्रार विद्यार्थिनींनी वरिष्ठ पातळीवर केल्यामुळे सदर संस्थाचालकावर न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ठ आहे. याबाबतच्या मागील अनेक वर्षापासून तक्रारी विद्यापीठाला प्राप्त झाल्या होत्या. विद्यापीठाने याबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेवून शासनाने सदर संस्थेच्या बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाची मान्यता रद्द केली आहे, असे परिपत्रक १२ ऑक्टोबर २0१७ ला काढण्यात आलेले आहे.