मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाला मिळाली संजीवनी

0
39
????????????????????????????????????

यशोगाथा

गोंदिया, दि.१५ः – पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातही गोंदिया जिल्ह्याची ओळख राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून आहे. ३५० वर्षापूर्वी सोळाव्या शतकात तत्कालीन गोंडराजा हिरशहा यांनी भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेता फर्मान काढले की, जो कोणी जंगले साफ करुन शेती करेल त्याला ती बहाल केली जाईल व जो कोणी तलाव बांधेल त्याला त्या तलावाखालील जितकी जमीन असेल ती खुद कास्तकार म्हणून बक्षीस दिली जाईल. या संधीचा उपयोग करुन घेत जिल्ह्यातील त्या काळच्या कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तत्कालीन शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची एक परंपरागत पध्दत आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरदृष्टीकोनातून तलावांची निर्मीती केली. ब्रिटीश काळात हया तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. सन १९५० मध्ये शासनाने हे तलाव मालगुजारांकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून हे तलाव माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जातात.
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गोंदिया हा मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यात मुख्यत: धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या धान शेतीला अनियमीत पडणाऱ्या पावसाचा फटका बसून धानाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो. जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या माजी मालगुजारी तलावातून सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने दूरदृष्टीकोनातून पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करुन त्यांना संजीवनी देण्याचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुळ सिंचन क्षमता पुनर्स्थापन करण्याचे काम काही वर्षात टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ४१८ मामा तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाला पहिल्या टप्प्यात सन २०१६-१७ या वर्षात सुरुवात करण्यात आली. यापैकी ३९७ तलावांच्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ३४७ कामे सुरु होवून १५५ तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण झाली. यामधून ६ लाख ६९ हजार ५८७.६७ घनमीटर गाळ या तलावातून काढण्यात आल्यामुळे तेवढीच पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे १७४८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ३५,४५८ हेक्टर इतकी आहे. १०० हेक्टर पेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे ३८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ६५१० हेक्टर इतकी आहे. मात्र या तलावातून प्रत्यक्षात अनुक्रमे १६,८२९ हेक्टर व ५८९० हेक्टर सिंचन होते.
माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमामुळे या तलावांची मुळ सिंचन क्षमता पुनर्स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी या तलावातील पाण्याचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. तलावांवर अवलंबून असलेल्या मत्स्य सहकारी संस्थांना देखील त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होत आहे.

तलावांच्या सर्वंकष दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मामा तलावांच्या जलविमोचकाची दुरुस्ती, आवश्यक त्या ठिकाणी नवीन जलविमोचकाचे बांधकाम करण्यात येत आहे. सांडवा दुरुस्ती व आवश्यक त्या ठिकाणी नवीन सांडव्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. ज्या तलावाच्या कालव्याद्वारे सिंचन होते त्या कालव्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्राची तपासणी करुन आवश्यक असल्यास तलावात पाणी येणारे मार्ग मोकळे करण्यात येत आहे. तलावांचे खोलीकरण करुन गाळ काढण्यात येत आहे. तलावात मत्स्य तळ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे.
५० हेक्टर पेक्षा जास्त सिंचन क्षमतेच्या तलावातील पाण्याचा उपयोग या पुनरुज्जीवनाच्या विशेष कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांनी करायला सुरुवात देखील केली आहे. केवळ एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात येणारी घट उपलब्ध पाण्यामुळे भरुन निघण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामात धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला, हरबरा, गहू ही पिके घेण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांना गत जलवैभव प्राप्त करुन देण्यासाठी तलावांच्या पुनरुज्जीवन करण्याचा विशेष कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. यामध्ये तलावातील पाण्याचा उपयोग करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. उदाहरण दयायचे झाल्यास सडक/अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथील निस्तारधारक शेतकरी समुह तलावाचे सुरक्षीत व्यवस्थापन करीत आहे. पाणी वापर संस्थेच्या नियंत्रणाखाली शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यात येते. तलावाची बरीचशी कामे शेतकरी श्रमदान व लोकवर्गणीतून करीत आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून संस्थेनी २ जलविमोचकाची दुरुस्ती, पाळीची, सांडव्याची, कालव्याची दुरुस्ती केली आहे. याव्यतिरिक्त शेतातील झिरपणारे पाणी इतरत्र व्यर्थ जावू नये म्हणून ६ मीटर व्यासाचे व ७ मीटर खोल विहिरीचे अतिरिक्त साठवणकरीता पक्के बांधकाम सुध्दा केले आहे. या विहिरीवर पंप लावून सदर पाण्याचा उपयोग ३० ते ४० हेक्टर अतिरिक्त सिंचनासाठी तसेच शाळेतील परसबागेसाठी करण्यात येत आहे.
मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा विशेष कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. तलावाच्या माध्यमातून शेतीला संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होत आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासोबत धान उत्पादक शेतकरी धानासोबतच इतर पिकांकडे वळत आहे. हा कार्यक्रम माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संजीवनी देणारा आहे.
०००००