मिग-२१ कोसळले,वैमानिक सुरक्षित

0
20

जामनगर-गुजरातमध्ये जामनगर येथे भारतीय वायुदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळले. वैमानिक या अपघातातून वाचला. आठवड्याभरात मिग विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी मंगळवारी २७ जानेवारी रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे वायुदलाचे मिग-२७ कोळलले होते. या अपघातातही वैमानिक वाचला होता. वायुदलाने जामनगर आणि बाडमेर येथील अपघातांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंतच्या चौकशीतून हाती आलेल्या माहितीनुसार, आठवड्याभरात कोसळलेली दोन्ही मिग विमानं २५ वर्ष जुनी होती. रशियाच्या विघटनानंतर मिग विमानांचे दर्जेदार सुटे भाग मिळवणे कठीण झाल्यामुळे अनेकदा या विमानांची वेळेवर देखभाल होत नाही आणि तांत्रिक बिघाडामुळे अपघात होतात. मिग विमानांचे अपघात वाढू लागल्यामुळे सरकारने ही विमानं टप्प्याटप्प्याने सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मिग विमानांची जागा तेजस हे हलक्या वजनाचे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आणि विदेशातून खरेदी केली जात असलेली विमानं घेणार आहेत. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि सर्व मिग विमान सेवामुक्त होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे.