भाजप तोडतंय, आपल्याला जोडायचंय : राहुल गांधी

0
9

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था)दि. १६ : – तुम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माझे कुटुंब आहात. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचे आणि प्रेमाचं राजकारण करू. पुढील काळात काँग्रेस सर्वांत जुना आणि तरुण पक्ष असेल (ग्रँड ओल्ड यंग पार्टी), असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

राहुल गांधी (47) यांनी शनिवारी काँग्रेसचे 60वे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. या निमित्ताने त्यांनी भाजप आणि मेादींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल म्हणाले, एकदा आग लागली तर ती विझविणे खूप कठीण असते. हेच आम्ही भाजपच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. एकदा तुम्ही देशात आग लावली. ती विझविणे खूप कठीण आहे. आज भाजपचे लोक पूर्ण देशात आग आणि हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रोखणारी पूर्ण देशात फक्त एकच शक्ती आहे आणि ती आहे काँग्रेस पक्ष. याआधी पक्ष मुख्यालयात निवडणूक अधिकारी एम. रामचंद्रन यांनी त्यांना सर्टिफिकेट प्रदान केले. राहुल अध्यक्षपदी विराजमान होणारे नेहरू-गांधी परिवारातील 6वे सदस्य आहेत. तथापि, सोनिया गांधी 19 वर्षे (1998-2017) काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या. राहुल 2013 मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष बनले होते.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही भाजपवाल्यांना आमचे भाऊ-बहीण जरूर मानतो, परंतु त्यांच्या विचारांशी सहमत नाही आहोत. ते आवाज दाबतात, आम्ही बोलण्याचे स्वातंत्र्य देतो. ते अपमान करतात, तर आम्ही सन्मान आणि रक्षण करतो.मी 13 वर्षांपासून राजकारणात आहे. राजकारणातून आता सत्य आणि दया संपत आहे. राजकारणाचा थेट संबंध लोकांशी आहे, परंतु आता राजकारणाचा संबंध लोकांशी राहिलेला नाही. काँग्रेसने देशाला 21व्या शतकात नेले, पण मोदी देशाला मध्ययुगाकडे नेत आहेत.