माळेगाव यात्रेतील पायाभुत सुविधांसाठी ६ कोटी ९५ लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

0
7

पालकमंत्री खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आले पाठपुराव्यास यश
नांदेड (नरेश तुप्तेवार),दि.19ः- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १६ डिसेंबर २०१७ च्या निर्णयान्वये लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील भौतीक पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी ६ कोटी ९५ लाख ३६ हजार १८१ रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देऊन त्यापैकी ५ कोटी ५० लाख रुपये जिल्हाधिकारी नांदेड यांना उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळेगाव यात्रेत विकास कामांच्या निधी संदर्भात घोषणा केली होती.या घोषणेनंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.या पायाभुत विकास कामांमध्ये दर्शन मंडप,अन्न क्षेत्रालय,स्वच्छता गृह,प्रवाशी निवारा,यात्रा व मंदिर परिसरात सुविधा,गुराना पाणी पिण्यासाठी हौद, धोबीघाट,पार्कींग सोय,संरक्षण भिंत,कुस्ती मैदान, अंतर्गत रस्ते,यात्रा कमान गेट,वीज पुरवठा,पथदिवे, अग्निशमन यंत्रणा,बोअरवेल,पंपहाऊस,पाणीपुरवठा आदी विविध विकास कामांचा समावेश आहे.याबाबत स्थानीक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही पाठपुरावा केला होता.                                                                                                                  यात्रा मानापमान, एकमेकांवर कुरघोडी, सवाल-जबाब आणि टिका-टिप्पणी यामुळे गाजत असते. दोन दिवसापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यांच्या सत्त्ताधारी लोकप्रतिनिधींवर टिका करताना वर्षभरापूर्वी जाहीर झालेला माळेगाव यात्रेचा निधी अद्याप का आला नाही, सरकार म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात अशी टिका करीत किमान कला महोत्सवाच्या अगोदर तरी हा निधी मंजूर करा, असे आवाहन केले होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी कृतीव्दारे सडेतोड उत्तर देत माळेगाव यात्रेसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.विशेष म्हणजे त्याचा अध्यादेश काल रात्रीच जारी झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांना तो प्राप्त झाला आहे. माळेगावच्या यात्रेच्या आढावा बैठकीस पालकमंत्री काही घरगुती अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नसले तरी नागपुरात जावून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या माळेगाव यात्रेचा निधी मिळण्यासंदर्भात पाठपुरावा केला.अर्थमंत्रालय,नियोजन मंत्रालय,पर्यटन मंत्रालय त्याचप्रमाणे बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व नियमांशी आधीन राहून हा निधी मंजूर करण्याची विनंती केली. कागदपत्रांची पूर्ण तपासणी करुन अखेर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाला हिरवा कंदील दाखवून साडेपाच कोटी रुपये मंजूर करण्याचे आदेश जारी केले. माळेगाव यात्रेत पर्यटनाच्या संदर्भात व यात्रेकरुंच्या सोयीसाठी ज्या विविध सुविधा यातून मिळणार आहेत.जिल्हा नियोजन विभागाने देखील यास दुजोरा दिला असून, सदरची कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यात दिल्याचे सूत्रांनी सांगितले.