‘अॅमवे’च्या उत्पादनांवर बंदी

0
17

नागपूर -सप्लिमेंटरी फूड्स अथवा न्युट्रिशन्सच्या नावाखाली वेगवेगळ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या ‘अॅमवे’ कंपनीच्या उत्पादनांवर अखेर अन्न व औषधे प्रशासनाने बंदी आणली आहे.
अॅमवे कंपनी साखळी विक्री पद्धतीच्या माध्यमातून अन्नाला पर्याय असलेल्या पदार्थांची विक्री करते. यासाठी त्यांनी नेमलेल्या एजन्ट्सना विक्री केलेल्या उत्पादनावर व नवनवीन एजन्ट्स तयार करण्याबद्दल आकर्षक कमिशन दिले जाते. मात्र, ही कंपनी खाद्यपदार्थ विक्री करीत असूनही कंपनीकडे अथवा त्यांच्या एजन्ट्सकडे विक्रीचा कुठलाही परवाना नाही. एवढेच नाही तर राज्याच्या अन्न व औषधे प्रशासनातील काही कर्मचारीच अॅमवेचे एजन्ट्स असल्याचे बोलले जाते.
मूळ दिल्लीमध्ये नोंदणीकृत असलेली ही कंपनी नागपुरात न्युट्रलाईट नॅचरल बी, न्युट्रलाइट कॅल मॅक सी, न्युट्रलाइट ट्रीओ आयर्न फोलिक टॅबलेट, न्युट्रलाइट बायो सी, पोस्टीरीम व्हॅनीला व लहान मुलांसाठी न्युट्रलाइट ड्रिंक मिक्स फ्रुट फ्लेव्हरची विक्री करते. मात्र, यापैकी एकाही उत्पादनासाठी कंपनीने दिल्लीच्या खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नाही. यामुळेच आता त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आली आहे.

याबाबत अन्न व औषधे प्रशासनाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले की, ‘या कंपनीचे उत्पादन विक्री दुकान इटर्निटी मॉलमध्ये आहे. ते बुधवारी बंद करण्यात आले. तसेच कळमेश्वर तालुक्यातील विपेज-गोंडखैरी येथील मायक्रो लॉजिस्टीक्स कॉम्प्लेक्समधील एफ-३ येथील गोदामावरदेखील छापा टाकण्यात आला. कंपनीला या उत्पादनांच्या विक्रीची परवानगी ‌मिळेपर्यंत त्यांची विक्री व वितरणावर बंदी आणण्यात आली आहे. जन आरोग्याच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली आहे.’ ही कारवाई शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त न.रं. वाकोडे, एम.सी. पवार, अन्नसुरक्षा अधिकारी अ.प्र. देशपांडे, प्र.अ. उमप व के.आर. गेडाम यांनी केली.