सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – खा. संभाजीराजे छत्रपती

0
12

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.5 – भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्यावतीने हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. याचवेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यसभेत निवेदन मांडले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांततेचे  आवाहन तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे. या भूमीत अशा प्रकारची घटना घडणे ही निंदनीय आहे असे त्यांनी नमूद केले.
खा. संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने संयम व शांतता राखावी, कारण मी छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील आहे. मला या घटनेबाबत प्रचंड दु:ख वाटत आहे. अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात कदापीही घडू नये असे मला वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोण्या एका समाजाला नाही तर १८ पगड जातीचे लोक आणि १२ बलुतेदार यांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराजांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच आदर्श घेऊन बहुजन समाजाला एकत्र आणले, जाती पातींच्या पलिकडे जाऊन समाज उध्दार घडवला आणि अशा माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत काल जो प्रकार घडला त्या घटनेने माझे मन हेलावले आहे. सर्व समाजातील एकीचे बळ हे देशाच्या विकासाचे साधन आहे. जेव्हा समाजात शांतता व सुव्यवस्था असते तेंव्हा देशाचा विकास होत असतो. पण भारतीय जनतेची ही एकी काही समाजविघातक शक्तींच्या डोळ्यात खुपत आहेत. यासाठी काही समाजकंटक या देशात जातीय तेढ वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. आपला देश विविध जाती – पंथ – धर्म – भाषा यांनी नटलेला आहे, येथे विविधतेत एकता आहे. त्यामुळे अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत. तसेच जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई सरकारने करावी, असे त्यांनी सांगितले.