ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ

0
11

मुंबई, दि. ६ – हिंदू, कोसला या कादंबरींमधून मराठी साहित्यप्रेमींच्या मनात स्थान पटकावणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले नेमाडे हे मराठी साहित्यातील चौथे साहित्यिक ठरले आहेत.

जळगावमधील सांगवी येथे जन्म झालेले भालचंद्र नेमाडे हे कादंबरीकार, कवी व समीक्षक म्हणून ओळखळे जातात. सुरुवातीला नियतकालिकांमधून कविता लिहीणारे भालचंद्र नेमाडे यांचे ५० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले कोसला हे पुस्तक चांगलेच गाजले. आशय व अविष्कार या बाबतीत ही कादंबरी आजच्या तरुण वाचकानांही भावते हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. कोसलानंतर बिढार, जरीला व झूर या कांदबरींचे त्यांनी लेखन केले. २०११ मध्ये प्रकाशित झालेली हिंदू ही कादंबरी साहित्य विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भालचंद्र नेमाडे यांनी अथक प्रयत्न केले. शुक्रवारी भारतातील साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भालचंद्र नेमाडेंना जाहीर करण्यात आला. १० लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मराठी साहित्यामध्ये यापूर्वी विष्णू सखाराम खांडेकर (१९७४), विष्णू वामन शिरवाडकर (१९८७) आणि विंदा करंदीकर (२००३) या तिघा साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.