बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच बसतात विद्यार्थी

0
9

देवरी,दि.19 : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे. परंतु तेथील विद्यार्थ्यांची सोय न करण्यात आल्यामुळे तेथील विद्यार्थी सदर बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच बसून असतात.
नवाटोला हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना देवरी येथील शाळेत ये-जा करणे धोक्याचे आहे. सत्र संपण्यासाठी थोडाच कालावधी बाकी असताना शाळा बंद पडल्याने पालकवर्ग चिंतेत सापडला आहे.या वर्षीचे सत्र संपण्याकरिता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. चालू सत्राचे शिक्षण गावच्या शाळेत पूर्ण होऊ द्यावे. पटसंख्या वाढीसाठी पालक वर्ग प्रयत्नशील आहेत. शाळा गावातच रहावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना पं.स. देवरी येथे निवेदन देण्यात आले. सीईओ यांनी सुध्दा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन पालक वर्गाला दिले. पालकांसोबत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळी चर्चा करुन त्यांच्या वेदना ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत न्याय होईल, अशी ग्वाही दिली.
या वेळी सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, सरपंच विद्या खोटेले, पं.स. मेहतर, कोराम आदी उपस्थित होते.