बिलोली तहासिल कार्यालयात दलालांचा सुळसुळाट

0
58
*प्रशासनाने केली माफियांसोबत हातमिळवणी
बिलोली,दि.30 ः-नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती भागात वसलेला बिलोली तालुका हा नेहमी कोणत्या न कोणत्या करणामुळे सतत चर्चेत येत असतो. सध्य स्थितीत तहसिल कार्यालय परिसरात दलालांचे प्रमाण वाढले असून प्रशासन सुध्दा या दलालांच्या सोबत हातमिळवणी केली असल्याने  जनसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रेती माफिया , मुरूम माफिया व इतर काही त्यांच्या हस्तकांसोबत तहसिल प्रशासनाचे कर्मचारी दिसत असल्यामुळे त्यांच्या हितसंबंधावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देईल का ? की दलालांचा सुळसुळाट असाच राहील ? असे प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थीत करीत आहेत.
गेल्या काही दिवसांत येथील प्रशासनात होत असलेला भ्रष्टाचार आणि त्याच्या सुरस कथा व त्याला रोखण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून होणारी कार्यवाही यामुळे नांदेड जिल्ह्यात सामाजिक पर्यावरण ढवळून निघाले आहे. नपा, तहसील, उपविभागीय परिवहन कार्यालय, तालुका रुग्णालय, न्यायालय, अशी लोकांचा नित्याचा संबंध असलेली विविध प्रशासकीय कार्यालये येथे आहेत. मात्र हे प्रशासन लोकांच्या सेवेसाठी की, लोकांकडून फक्त मेवा घेण्यासाठी आहे, असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती येथील जवळपास सर्वच कार्यालयात निर्माण झाली आहे. गत वर्षी उपजिल्हाधिकारी पदावर नव्याने रूजू झालेले निवृत्ती गायकवाड हे रेती माफियांवर धाडसी कार्यवाही करून 6 जेसीबी व 15 ते 20 रेतीचे ट्रक जप्त केले होते. त्यावेळी पहिल्यांदा येथील प्रशासन आणि त्याचा कारभार याबद्दल चर्चा सुरू झाली. यावेळी प्रशासन आणि दलाल यांची अभद्र युती याबद्दल दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू राहिली.  येथील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि त्यांचे दबाब गट यांच्याशी त्यांचा दुरान्वयाने का होईना संबंध येत असतो. मात्र कालांतराने हे संबध ‘हितसंबंधात’ परिवर्तीत होतात आणि जनेतेचे हित पाहण्यापेक्षा आपलेच हित साधण्यात ही मंडळी दंग होतात आणि मग याचा फटका सामान्य लोकांना बसतो. बिलोली शहरात देखील हेच घडते आहे. आपण काहीही केले तरी काहीच होत नाही, हे प्रशासनाचे निर्ढावलेपण येथील प्रत्येक कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना अस्वस्थ करीत आहे. तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असल्याने ‘चिरीमिरी’चा व्यवहार आणि ‘चहापान’ कार्यक्रम झाल्याखेरीज कामाचा एक कागददेखील पुढे सरकत नाही. अशा भीषण वास्तवाला रोजच नागरिकांना भिडावे लागते आहे. मात्र भ्रष्टाचारात बरबटलेल्या व्यवस्थेविरोधात लढायचे कोणी? असा सवाल डोक्यात ठेवत अपरिहार्यपणे या व्यवस्थेला प्रत्येक जण बळी पडतो आहे. या भ्रष्ट व्यवस्थेत बदल घडावे, यासाठी आपापल्या पातळीवर अनेक सामाजिक, राजकीय, माहिती अधिकार कार्यकर्ते लढत असले तरी भ्रष्ट व्यवस्थेच्या गोंगाटात त्यांचा आवाज कसा दाबला जाईल, याचे देखील पद्धतशीर प्रयत्न केले जात असतात. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्ष पणाचा फायदा बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी घेत असून या कार्यालयातील अधिकारी “आओ जाओ घर तुम्हारा” या उक्तीप्रमाणे दररोज नांदेड वरून ये जा करीत असतात. यामध्ये तहसिलदार गुंडमवार हे आठ दिवसातून एक ते दोन वेळा तेही आपल्या वेळेप्रमाणे येत असल्याने या अधिका-यांवर कुणाचेही वचक राहीले नसाल्याचे बोलले जात आहे. याबाबत अनेक वेळा उपजिल्हाधिकारी साहेबांना कल्पना दिली असता त्यांनी मी याची दखल घेतो , त्यांना जाब विचारतो अशी उत्तरे दिली मात्र आजपर्यंत यांच्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. उलट तहसिल प्रशासनाचे जबाबदार अधिकारीच रेती माफिया , मुरूम माफिया व त्त्यांच्या इतर हस्तकांसोबत सतत वावरत असल्यामुळे सध्य स्थितीत बिलोली तहसिल कार्यालयात दलालांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. अधिकारी व माफिया यांच्या मिलीभगत मुळे तालुक्यात दिवसरात्र रेती उत्खनन , मुरूम उत्खनन चालू असून यामुळे शासनाचा करोडो रूपयाचा महसुल पाण्यात जात आहे.  याकडे जिल्हा प्रशासन लक्ष घालून काही ठोस भुमिका घेईल का ? की दलालांचा सुळसुळाट असाच राहील ? असे प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थीत करीत आहेत.
.

Attachments area