यशवंत सिन्हांनी स्थापन केला राष्ट्रीय मंच

0
9

नवी दिल्ली,दि.30(वृत्तसंस्था)– भारतीय जनता पक्षाचे (भाजप) बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी महात्मा गांधींच्या 70व्या पुण्यतिथी दिनी राष्ट्रीय मंचची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्दावर आम्ही लढणार असल्याचे यशवंत सिन्हा म्हणाले. त्यांच्यासोबत यावेळी काँग्रेसच्या रेणुका चौधरीही होत्या.पत्रकार परिषदेत सिन्हा म्हणाले, ‘राष्ट्रीय मंचचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी असणार आहे. जीएसटीमुळे छोटे उद्योजकांचे धाबे दणाणले आहे. बेरोजगारीचा मुद्दा अजून सुटू शकलेला नाही. कुपोषणाचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही. देशांतर्गत सुरक्षेबद्दल बोलायचे तर असे वाटते की जमावच न्याय करणार आहे. जात, धर्म यांच्यावर जेव्हा जमाव वरचढ होतो तेव्हा त्याला रोखणे अवघड होऊन जाते. सरकारकडून सांगितले जाते की आमचे सर्वात मोठे यश विदेश धोरण आहे. त्यासाठी तुम्ही डोकलाम पाहू शकता. आता कोणी 56 इंच छातीबद्दल विचारत नाही.’

यशवंत सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक झाले आहेत. त्यांच्या राष्ट्रीय मंचमध्ये शत्रुघ्न सिन्हा, दिनेश त्रिवेदी(टीएमसी), माजिद मेमन, संजय सिंह(आप), सुरेश मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री), हरमोहन धवन(माजी केंद्रीय मंत्री), सोमपाल शास्त्री(कृषि अर्थशास्त्रज्ञ), पवन वर्मा(जेडीयू), शाहिद सिद्दीक़ी, मोहम्मद अदीब, जयंत चैधरी(आरएलडी), उदय नारायण चौधरी(बिहार), नरेंद्र सिंह(बिहार), प्रवीण सिंह (गुजरातचे माजी मंत्री), आशुतोष (आप) आणि घनश्याम तिवारी (सपा) यांचा समावेश आहे.दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सिन्हा म्हणाले, आम्ही अचानक एकत्र आलेलो नाही. बऱ्याच महिन्यांपासून आम्ही संपर्कात होतो. देशातील वर्तमान स्थितीची चिंता वाटते असेही सिन्हा म्हणाले. आम्हाला वाटते की देशातली जनतेसाठी आंदोलन करण्याची गरज आहे. आम्ही सर्व वैचारिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत.

यशवंत सिन्हा म्हणाले, आम्ही महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहाण्यासाठी राजघाटवर गेलो होतो. परंतू वाटते की बापूंचे सरकारीकरण झाले आहे. आम्हाला आत जाऊ दिले नाही. बराच वेळ विनंती केल्यानंतर आम्हाला व मीडियाला आत सोडले.सिन्हा म्हणाले, 70 वर्षांपूर्वी त्या महामानवाने देशासाठी बलिदान दिले. वर्तमानातही देश अजून त्याच समस्यांनी ग्रस्त आहे. आज आम्ही उभे राहिलो नाही तर बापूंचे बलिदान व्यर्थ जाईल.

अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर जीएसटी, नोटबंदीवरुन टीका केली आहे. ते म्हणाले होते, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर सरकारने स्विकारलेल्या धोरणावरही टीका केली आहे.एका लेखात सिन्हा म्हणाले होते, ‘देशाची अर्थव्यवस्था सध्या वाईट स्थितीत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये खासगी क्षेत्रात गुंतवणूक सर्वात कमी झाली आहे. जीएसटी अतिशय चुकीच्या पद्धतीने लागू झाले आहे. यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. अर्थव्यवस्था आधीच ढासळत चालली होती त्यात नोटबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केले.’- एका मुलाखती सिन्हा म्हणाले होते, की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटीसाठी वेळ मागितला होता, मात्र त्यांनी वेळ दिला नाही.