गरजूंची सेवा हिच देशसेवा -एस.एन. जाधव यांचे प्रतिपादन

0
18
‘एक शाम जवानो के नाम’ कार्यक्रम उत्साहात
गोरेगाव,दि.31 : देश एकीकडे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे तर दुसरीकडे अनेक निराधार व गरजू शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतीची वाट बघत आहेत. निराधार व गरजुंची मदत करून सेवा करावी, हिच पण देश सेवा आहे. म्हणून प्रत्येकांनी अशा निराधारांना मदत करून मुख्य प्रवाहात आणावे. असे प्रतिपादन आरएफओ एस.एन. जाधव यांनी केले.
ते पिंडकेपार येथे युवा महाशक्ती मंचद्वारे आयोजित (दि.२६) ‘एक शाम जवानो के नाम’ कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी परमवीरचक्र पुस्तकाचे लेखक शिवाजीराव बढे, पं.स. सदस्य केवलराम बघेले, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, के.एस. वैद्य, सरपंच दुलीचंद रहांगडाले, दीपक बोपचे आदी उपस्थित होते.
‘एक शाम जवानो के नाम’ या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजीराव बढे यांच्या हस्ते, आरएफओ एस.एन. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी शिवाजीराव बढे म्हणाले की, सैनिक आपले कुटुंब सोडून देशाचे रक्षण करतात. तर त्यांचे कुटुंब समाजकार्य करतात. यावेळी रक्षणकरताना अनेक सैनिक शहीद होतात. त्यांना परमवीरचक्र देऊन सलामी देतात. परंतु आजच्या पिढीला परमवीरचक्र विषयी माहिती योग्य माहिती नाही. परमवीरचक्र कोणाला मिळतो, कसा मिळतो याची जाणीव नसते. मी स्वत: अनेक महिने यावर शोध केला व त्यांच्यावर विस्तृत लेखन केले आहे. सैनिकांच्या कुटूंबियांना व सैनिकांना आत्मबल मिळावा म्हणून युवा महाशक्ती मंचने जो कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सन्मान केला. ही कामगिरी उत्कृष्ट असून युवा महाशक्ती मंचाला सलाम करतो. प्रत्येकानी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशसेवा करावी. यावेळी वैद्य, केवलराम बघेले, सुरेंद्र बिसेन, दुलीचंद रहांगडाले यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
आरएफओ जाधव, शिवाजीराव बढे यांच्या हस्ते देशाचे रक्षणकर्ते गणेश धानगुणे, चंद्रशेखर जोशी, सावन मडावी, सुरेश रहांगडाले, रंजित पटले, गुन्नीलाल बघेले, विजेंद्र बिसेन व दुर्गेश चौधरी यांच्या कुटूंबियांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.