अर्जुनी मोरगाव येथील जळीतप्रकरणी तिघांचा मृत्यू

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.02(संतोष रोकडे)ः- स्थानिक सिव्हिल लाइन्स परिसरात २८ जानेवारी रोजी एका घरात भाजलेल्या चार जणांपैकी तिघांचा मृत्यू नागपूर मेडीकलमध्ये झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव येथील रेल्वेस्थानक मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयासमोर सिव्हिल लाइन्स परिसरात खांडेकर कुटुंबातील तिनजणांसह सचिव गौतम असे चारजण जळाल्याची घटना २८ जानेवारीला सायंकाळी ७.१५ वाजता घडली होती. प्रेमप्रकरणातून हे जळीत हत्याकांड घडल्याच्या चर्चा शहरात सुरु आहे. चौघेजण भालेल्यात संजय खांडेकर (५०), सुनिता संजय खांडेकर (४५), आचल संजय खांडेकर (२६) तर सचिन राजकुमारसिंह गौतम (२८) हे चारजण जळलेले होते. ही आग रॉकेल किंवा पेट्रोल टाकून लावण्यात आल्याच्या चर्चा आहेत. २८ जानेवारीला हे जळीतकांड घडल्यानंतर सर्व भाजलेल्या जखमींना सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने चारही जळालेल्यांना नागपूर मेडीकल येथे हलविण्यात आले होते. उपचार चालू असताना २९ जानेवारीला सुनीता संजय खांडेकर या महिलेचा मृत्यू झाला तर १ फेब्रुवारीला संजय खांडेकर यांचा मृत्यू झाला तर आज, २ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता सचिन गौतम यांचा मृत्यू झाला.
यामधील आचल खांडेकर हिच्यावर अजूनही नागपूर मेडीकल येथे उपचार सुरु आहे. यातील मृतक संजय खांडेकर हे आयटीआय कॉलेज मोरगाव येथे परिचरपदावर कार्यरत होते. प्रेमप्रकरणातूनच हे जळीत हत्याकांड घडल्याच्या चर्चा अर्जुनी मोरगाव शहरात सुरु आहेत.