विदर्भातील 17 खेळांडूना छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहिर

0
9

गोंदिया,दि.13 : क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती, जिजामाता, एकलव्य क्रीडा पुरस्कारांची सोमवारी मुंबई येथे घोषणा करण्यात आली. त्यात विदर्भातील एकूण 17 विजेत्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये भंडाराची दिपाली शहारे,कल्याणी बेंदेवार,  वाशीमचे रोहिदास पवार, अकोल्याचे शत्रुघ्न बिरकड, अमरावतीचे प्रमोद चांदूरकर, आर्चरीतील आंतरराष्ट्रीय पदक विजेती पूर्वशा शेंडे, वृषाली गोरले, विदर्भाचा पहिला ग्रॅंडमास्टर स्वप्नील धोपाडे, अमरावतीच्या संगीता येवतीकर यांचा समावेश आहे.

शासनातर्फे 2014 ते 2017 या तीन वर्षांतील छत्रपती पुरस्कारविजेते जाहीर करण्यात आले. यात नागपुरातील बुद्धिबळपटू अनुप देशमुखशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला हॅण्डबॉलपटू पूनम कडव, स्केटर पीयूष आकरे, आट्यापाट्या संघटक अशोक पाटील, पॉवरलिफ्टर गुणवंत कमलेश लांजेवार व प्रतिमा बोडे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर अनुपला 2016-17 या वर्षासाठी क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार घोषित झाला. राज्य शासनातर्फे त्यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्याची ही दुसरी वेळ होय. यापूर्वी 1999 मध्ये खेळाडू म्हणून त्यांना छत्रपती पुरस्कार मिळाला होता. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकावणाऱ्या अनुपने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. युवा हॅण्डबॉलपटू पूनमलाही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. तिलादेखील 2016-17 या वर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. सुनील भोतमांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या पूनमने बांगलादेशमधील आयएचएफ ट्रॉफी (2016), थायलंडमधील दक्षिण आशियाई ज्युनियर हॅण्डबॉल स्पर्धा (2017) आणि उझबेकिस्तानमधील (2017) आशियाई महिला लीग या तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

विदर्भातील पुरस्कारविजेते खेळाडू व संघटक
2014-15 : उत्कृष्ट संघटक : अशोक पाटील (नागपूर, आट्यापाट्या), रोहिदास पवार (वाशीम). उत्कृष्ट खेळाडू : पीयूष आकरे (नागपूर, स्केटिंग), पूर्वशा शेंडे, वृषाली गोरले (दोघीही अमरावती, आर्चरी), सागर गुल्हाणे (वाशीम, आट्यापाट्या), नीता रंगे (अमरावती, आट्यापाट्या).
2015-16 : उत्कृष्ट संघटक : प्रमोद चांदूरकर (अमरावती, आर्चरी), उत्कृष्ट खेळाडू : स्वप्नील धोपाडे (अमरावती, बुद्धिबळपटू), अमित चव्हाण (वाशीम, आट्यापाट्या), दीपाली शहारे (भंडारा, आट्यापाट्या), एकलव्य पुरस्कार : गुणवंत कमलेश लांजेवार (नागपूर, पॉवरलिफ्टर), प्रतिमा बोंडे (नागपूर, पॉवरलिफ्टर), जिजामाता पुरस्कार : संगीता येवतीकर (अमरावती).
2016-17 : उत्कृष्ट मार्गदर्शक : अनुप देशमुख (नागपूर, बुद्धिबळ), उत्कृष्ट संघटक : शत्रुघ्न बिरकड (अकोला), कल्याणी बेंदेवार (भंडारा, आट्यापाट्या), उत्कृष्ट खेळाडू : पूनम कडव (नागपूर, हॅण्डबॉल).