९८ लाखांसह पाच दरोडेखोरांना अटक

0
7

नागपूर,दि.27 – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी (ता. २४) अटक केली. आरोपींकडून ९८ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि दोन काडतुसांसह पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांचे पथक शनिवारी सायंकाळी बजाजनगर परिसरात गस्त घालत होते. रहाटे कॉलनीतील उज्ज्वल प्लॉटमधील एका फ्लॅटमध्ये पाच जण संशयितपणे लपून बसल्याची माहिती गुप्तहेराने दिली. माहिती मिळताच ते पोलिस पथकासह रहाटे कॉलनीत आले आणि सापळा रचला. त्यांना कळायच्या आतच पोलिसांनी घेराव केला आणि अटक केली. त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली तसेच अंगझडती घेतली. दरम्यान, आरोपींकडे देशी बनावटीचे ऑटोमॅटिक पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. बॅगमध्ये ९८ लाख रुपयांच्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आढळून आल्या. संतोष जयवंतराव कदम (३६, यवतमाळ), राजेश देवीदास चांडक (२५, रा. मेडिकल चौक), दीप महानगू मार्शल (३५, वॉर्ड क्र. १, आनंदनगर (जि. चंद्रपूर), राधेलाल बेनीराम लिल्हारे (२७, खैरी, बालाघाट) आणि संतोष लक्ष्मीकांत कैकर्यमवार (३८, सीजीएम कॉम्प्लेक्‍स, वेकोलि, वणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची (ता. २८) पोलिस कोठडी दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, संजय चव्हाण, उपनिरीक्षक श्रीनिवास मिश्रा, हवालदार अफसर खान पठाण, रमेश उमाठे, नरेश रेवतकर, नरेश सहारे, अमित पात्रे, आशीष ठाकरे, रवींद्र बारई, राहुल इंगोले, मंगेश मंडावी, आशीष देव्हारे, राजेंद्र सेंगर, अविनाश तायडे, नीलेश वाडेकर यांनी केली.