गडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण

0
9

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.03: नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले. एका लेखकाच्या पुस्तकातील उतारा एकाचवेळी इतक्या लोकांनी श्रवण करण्याचा हा नवा जागतिक विक्र म ठरणार आहे. त्यासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या वतीने निरीक्षणही करण्यात आले.
यापूर्वी अशा प्रकारच्या श्रवणासाठी ५ हजार ७५० जणांची उपस्थिती नोंदविण्याचा विश्वविक्र म तुर्कस्तानच्या नावावर आहे.सकाळी ९ वाजतापासून जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थी व नागरिकांचा मैदानात प्रवेश सुरू झाला. दुपारी २ वाजता ७०४१ जणांची नोंदणी झाल्यानंतर पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनी ‘गांधी विचार आणि अहिंसा’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. तत्पूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कार्यक्रमस्थळी येऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यातून शांततेचा संदेश नागरिकांपर्यंत जाईल, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा,बुधराम मुंडा हे सहभागी झालेले होते. त्यांचा गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार अशोक नेते,आमदार डॉ. देवराव होळी,जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर,नगरपरिषद अध्यक्षा सौ.पिपरे,जिल्हाधिकारी शेखर सिंग,सहा.जिल्हाधिकारी सचिन ओंबासे उपस्थित होते.
या रेकॉर्डचे निरीक्षण नोंदविण्यासाठी गिनीज बुकच्या वतीने कन्सलटंट मिलींद वेर्लेकर व त्यांची चमू उपस्थित होती. उपस्थितांच्या हातांवर बारकोड असलेले पट्टे बांधून उपस्थितीची नोंद डिजीटल पद्धतीने करण्यात आली. याशिवाय विविध अटींची पूर्तता करण्यात आली असून विविध कॅमेऱ्यांनी टिपलेल्या निरीक्षणांचा अभ्यास व अटींची पूर्तता तपासल्यानंतर २० दिवसांनी विश्वविक्र माबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. जिल्हा पोलीस दल, आदर्श मित्र मंडळ, उडान फाऊंडेशन, लक्ष्मीनृसिंग पतसंस्था आदींच्या पुढाकारातून या कार्यक्र माचे आयोजन केले होते.प्रभारी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक राजा रामासामी,अप्पर पोलीस अधिक्षक(अभियान)हरी बालाजी यांनी विशेष लक्ष ठेवत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.