विद्यार्थ्याच्या अंगावर फेकला चहा

0
8

आमगाव,दि.04ः होळीनिमित्त आपल्या शिक्षकांना सुद्धा रंग लावू असा विचार करुन विद्यार्थ्याने रंग लावण्याचा प्रयत्न करताच शिक्षकाने रागाच्या भरात चिमुकल्या विद्यार्थ्याला मारहाण करुन गरम चहा त्याच्या अंगावर फेकल्याची घटना आमगाव तालुक्यातील कवडी (केंद्र अंजोरा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (दि.३) सकाळी घडली. चिमुकल्याला मारणाºया शिक्षकाचे नाव नितीन रहांगडाले असून ते पानगावचे रहिवासी आहेत.
शुक्रवारी रंगोत्सवाची शासकीय सुट्टी होती. मात्र शनिवारी (दि.३) सकाळ पाळीची शाळा होती. ‘बुरा न मानो-होली है’ अशी होळीसाठी म्हण असून त्यानुसार विद्यार्थी शाळेत रंग खेळू लागले. एकमेकांना रंग लावतानाच पाचव्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना सुद्धा रंग लावू असा विचार केला व शिक्षकांच्या खोलीत जाऊन उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांना गुलाल लावू लागले. मुख्याध्यापक सी.बी.पारधी यांनी रंग लावू दिला. शिक्षक त्यावेळी चहा घेत होते.
यातच पाचव्या वर्गातील विद्यार्थी निलेश उमेश बावनथडे (११) याने शिक्षक रहांगडाले यांना गुलाल लावताच रागाच्याभरात रहांगडाले यांनी विद्यार्थ्याच्या कानशिलात व मानेवर जोरात बुक्का मारला. यामुळे निलेश जमिनीवर पडला. यावर त्याला सांत्वना न देता उलट त्याच्या अंगावर रहांगडाले यांनी गरम चहा फेकला. विद्यार्थी खाली पडल्याने त्याच्या डाव्या हाताला व उजव्या पायाला चांगलीच जखम होऊन रक्त निघू लागले. हा प्रकार निलेशच्या वर्गमित्रांनीही बघितला. या प्रकाराने सर्व मुले चांगलीच घाबरली.
निलेशने आपल्या आई-वडीलांना घडलेला प्रकार सांगताच सरपंच लखन भलावी, उपसरपंच ठाकरे तसेच गावकरी शाळेत पोहचले. शाळेत एकच गोंधळ सुरु झाला. गावकºयांनी सदर शिक्षकाविरुद्ध भयंकर संताप व्यक्त केला. गावकरी चिडून जाऊन सदर शिक्षकाला चांगलाच चोप देणार, त्यापूर्वीच काही लोकांनी त्यांना शाळेच्या एका खोलीत लपून ठेवले व त्यामुळे पुढील अनर्थ टळला.