खंडणीच्या गुन्ह्यात भ्रष्टाचार निवारण समितीच्या तिघांना अटक

0
11

गडचिरोली, दि.८: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला धमकावून त्याला १ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी, तसेच एका दारुविक्रेत्याच्या घराची नासधूस करुन त्यालाही रकमेची मागणी केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी भ्रष्टाचार निवारण समितीचा जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचा लोकसभा सचिव कुणाल पेंदोरकर याच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कुणाल पेंदोरकर रा.गडचिरोली, विवेक बारसिंगे रा. विवेकनगर चंद्रपूर, पंकज प्रदीप बारसिंगे रा.सुभाष वॉर्ड गडचिरोली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, अन्य दोन आरोपी आरिफ पीरमोहम्मद कनोजे व मदन दयाल मडावी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरिफ कनोजे हादेखील काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील दहेगाव येथील रुपेश रामदास चलाख यांच्या घरी शौचालयाचे बांधकाम सुरु असल्याने त्यांनी विनोद चुनारकर यास ट्रॅक्टर घेऊन रेती आणण्यासाठी एकोडी नदीघाटावर पाठविले. रेती भरुन परत येत असताना उपरोक्त पाचही आरोपींनी ट्रॅक्टर अडवून धमकावले व १ लाख रुपयांची मागणी केली. माहिती मिळताच रुपेश चलाख यांनी घटनास्थळ गाठले असताना त्यांनाही धमकावून मारहाण केली व १० हजार रुपये खिशातून काढून घेतले. यासंबंधी चलाख यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी उपरोक्त आरोपींवर भादंवि कलम ३९५ व ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यातील कुणाल पेंदोरकर,विवेक बारसिंगे, पंकज प्रदीप बारसिंगे यांना अटक करण्यात आली, तर आरिफ पीरमोहम्मद कनोजे व मदन दयाल मडावी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेच आरोपी सगणापूर येथील विनोद येग्लोपवार यांच्या घरी गेले होते. त्याला दारु विक्री करीत असल्याबाबत धमकावून त्याच्या घरातील सामानाची नासधूस केली आणि भ्रष्टाचार निवारण समितीचा मोठा कार्यक्रम असल्याचे सांगून ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे येग्लोपवार यांनीही पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम ३८४, ४४८, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मल्हार थोरात, निशा खोब्रागडे, सहायक फौजदार कुंजनसिंह बघेल, हवालदार राजू उराडे, हवालदार चंद्रशेखर काकडे, सुनील हजारे, नजीर पठाण, धर्मा सिडाम, मनिषा हुलके करीत आहेत.