सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शावर महिलांनी वाटचाल करावी -सविता पुराम

0
41

जागतिक महिला दिन साजरा
अर्धनारेश्वरालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा

गोंदिया,दि.८ : महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. महिला हया दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत आहे. महिलांनी प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. असे प्रतिपादन माजी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम यांनी केले.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थानात तहसिल कार्यालय सालेकसा, जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया व सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा यांच्या संयुक्त वतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळाव्याच्या उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पं.स.उपसभापती दिलीप वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार प्रशांत सांगळे, पं.स.सदस्य प्रतिभा परिहार, हिरालाल फाफनवाडे, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांची तर मंचावर सहारा लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा अर्चना चुटे, सचिव सुकेशना रहांगडाले, सदस्य सुनिता थेर, दमयंती मौजारे, धनवंता वडगाये, शिला मेश्राम यांची उपस्थिती होती.
श्रीमती पुराम म्हणाल्या, महिला आता केवळ चुल आणि मुल यापुरत्या मर्यादित न राहता पुरुषाच्या खांदयाला खांदा देवून प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. महिलांनी कुटूंबाकडे लक्ष्य देवून काम केले तर त्या सर्वच क्षेत्रात यशस्वी होतील असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्ष म्हणून बोलतांना श्री.वाघमारे म्हणाले, देशात महिलांना एकीकडे पुजनीय स्थान आहे, तर दुसरीकडे तिच्याकडे हिनतेने बघितले जाते. महिलाने स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यास त्या प्रगतीकडे वाटचाल करतील. महिला शिक्षीत झाल्या तर त्या त्यांच्या हक्कांबाबतीत जागरुक होतील. महिलांनी जुन्या परंपरा, रितीरिवाज यांना तिलांजली देण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये समाजाचा उध्दार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सिल्हारे म्हणाले, महिला जर सामाजिकदृष्टया सक्षम झाल्या तर आर्थिकदृष्ट्या त्या समृध्द होतील. महिलांसाठी बँकांच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग करुन समृध्दीचा मार्ग प्रशस्त करावा. बँकांच्या विविध योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. स्टॅन्ड अप इंडिया या अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांसाठी असलेल्या बँकेच्या योजनाचा महिलांनी लाभ घेवून विकासाचा मार्ग प्रशस्त करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री.जागरे म्हणाले, महिलांच्या विकासात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे महत्वाचे योगदान आहे. महिलांना आजही पाहिजे तसे मानाचे स्थान मिळत नाही. महिलांच्या बाबतीत पुर्वी असलेल्या केशवपण सारख्या प्रथा बंद केल्या आहेत. महिलांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. स्त्री भ्रृण हत्या थांबल्या पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज संघटीत झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.बेदरकर म्हणाल्या, महिला आजही निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. पुर्वी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उध्दारी असे म्हटले जायचे. पण आज महिलांच्या हाती ध्वजारोहणाची दोरी आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोडबिलामुळे महिलांना आत्मसन्मान मिळाला आहे. अनेक कर्तृत्ववान महिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महिलांनी वाटचाल करावी असे त्या म्हणाल्या. श्रीमती रामटेके म्हणाल्या, महिलांवर आजही अत्याचार होतात. अत्याचाराचे प्रमाण आजही कमी झालेले नाही. डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या मुलमंत्रानुसार काम करावे. महिलांसाठी ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या १० टक्के निधीचा वापर महिलांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. कौंटूबिक हिंसाचार कायदयाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. महिलांचे जीवन उध्वस्त होवू नये म्हणन हा कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सांगळे म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे जीवन परिवर्तन आणखी वेगाने होण्याची आवश्यकता आहे. अनेक महिलांनी विविध बँकांचे कर्ज घेवून यशस्वीपणे उद्योग व्यवसाय सुरु करुन आदर्श निर्माण केला आहे असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून श्री.खडसे म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना बँकांच्या विविध योजनांची माहिती होण्यास मदत होत आहे. महिलांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड केली आहे. मुद्रा योजना महिलांना स्वावलंबी करण्यास उपयुक्त ठरत आहे. जास्तीत जास्त महिलांनी राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री.फाफनवाडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
सालेकसा तालुक्यातील उत्कृष्ट महिला बचतगट म्हणून जिजाबाई महिला स्वयंसहाय्यता बचतगट पांढरी, चांदणी महिला स्वयंसहाय्यता बचतगट गांधीटोला, मातोश्री महिला स्वयंसहाय्यता बचतगट हलबीटोला, गायत्री महिला स्वयंसहाय्यता बचतगट तिरखेडी, उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून रचना ग्रामसंस्था रोंढा, दर्पण ग्रामसंस्था लोहारा, कचारगड ग्रामसंस्था जमाकुडो व भविष्य ग्रामसंस्था ब्राम्हणटोला, उत्तम समुदाय साधन व्यक्ती म्हणून गीता सोनटक्के(कोटजंभोरा), ज्योती चुटे(भजेपार), मंजू कुंभरे(हलबीटोला), मालती बारबते (कावराबांध), उत्तम पशुसखी म्हणून सुनिता रहांगडाले(खोलगड), रेखा रहांगडाले(पांढरी), अर्चना सहारे(कहाली), ज्योती दोनोडे(सलंगटोला) यांचा स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप कुकडकर, सुरेंद्र टेंभरे, भुषण कोरे, झनक तुरकर, श्री.ढेकवार, देवेंद्र शहारे, लक्ष्मी नागदेवे, प्रशांत बारेवार, छाया मोटघरे, अर्चना कटरे, दुर्गा देशमुख, नैना कटरे, उषा पटले, मंदा करंडे, कामेश्वरी गोंडाणे, सुशीला बघेले, मुकेश भुजाडे, रवि कटरे, पन्नालाल पटले, नैना अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.