किसान लाँग मार्चचे विधीमंडळात पडसाद

0
12

मुंबई,दि.12(विशेष प्रतिनिधी)- नाशिक ते मुंबई असे 180 किमीचे अंतर गेली सहा दिवस कापत मुंबईत पोहचलेल्या किसान लाँग मार्चमुळे सरकारची धडकी भरली आहे. 30 हजारांहून अधिक आंदोलक राजधानी मुंबईत आले असून, त्यांनी आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे. थोड्याच वेळात ते विधान भवनाला घेराव घालणार आहेत. दरम्यान, हे लाल वादळ रोखण्यासाठी सरकार कामाला लागले असून, आंदोलक मोर्चेकरांशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा मंत्र्यांची समिती गठित केली आहे. ही समिती दुपारी दोन वाजता विधीमंडळात आंदोलकांशी चर्चा करणार आहे.

या समितीत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख आदी वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. त्यात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या चर्चेदरम्यान, सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंदोलक मोर्चेकरांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.तर विधानसभेत या शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरितीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.

सरकार झोपले होते काय?- विखे पाटील

दरम्यान, लाँग मार्च मुंबईत धडकताच आज विधीमंडळात या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने शेतकरी मोर्चाकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत सडकून टीका केली. सरकार काय झोपले होते काय, मंत्रिगट आधीच स्थापन करायला हवा होता असे विखे पाटलांनी सांगितले.

गिरीश महाजनांनी नौटंकी बंद करावी- अजित पवार

अजित पवार यांनीही गेली सहा दिवस शांततेने व संयमाने 180 किमीचा चालत येऊन आल्याबाबत आंदोलकांचे कौतूक केले. तसेच पालकमंत्री शेतक-यांना मुंबईत भेटल्याबाबत टीका केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भेट घेण्याची नौटंकी करण्यापेक्षा नाशिकमध्येच भेटून चर्चा केली असती तर त्यांना इतके दिवस चालत येण्याचे कष्ट पडले नसते, अशी टीका अजित पवार केली.

तर आंदोलकांचा संयम तुटेल- गणपतराव देशमुख

आंदोलक शेतकरी आपल्या मागण्या शांततेने व संयमाने करत आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा हे आंदोलन मोर्चेकरांच्याही हाती राहणार नाही, अशी भीती ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली.