आधार लिंक करण्यास सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आधारशी संबंधित याचिका निकाली निघेपर्यंत

0
4

नवी दिल्ली,दि.13(वृत्तसंस्था) – सुप्रीम कोर्टाने विविध सेवांशी आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधारला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय पीठाने हा निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाचा समाज कल्याण विभागाच्या योजनांचा फायदा मिळण्यासाठी केल्या जाणाऱ्या आधार लिंकच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

आधार विरोधातील याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे वकील अरविंद दातार यांनी कोर्टाला सांगितले की, पारपत्र (पासपोर्ट) प्राधिकरणाने पारपत्र देण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने मुदतवाढीचा हा आदेश दिला. अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी याबाबत लगेच स्पष्टीकरण देत सांगितले की, केवळ तत्काळ पासपोर्ट हवा असणाऱ्यांसाठी ही अट ठेवण्यात आली आहे.बँक अकाऊंट्स, मोबाईल आणि इतर सेवांशी आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आलेली होती. सुप्रीम कोर्टाने 15 डिसेंबरला मुदतवाढ करत 31 मार्च ही तारीख दिली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने थेट आधारच्या याचिका निकाली निघेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.