मुख्य बातम्या:

चिचटोल्यात मनरेगात अडीच ते तीन लाखाचा भ्रष्टाचार

सडक अर्जुनी,दि.14- तालुक्यातील चिचटोला येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात सन २०१७-१८ मध्ये मनरेगाच्या कामात अडीच ते तीन लाख रुपयांचा भष्ट्राचार केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार उघड झाली आहे.या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावातील युवा शक्ती परिवर्तन पॅनलच्या वतीने दिलीप डोंगरवार, सदाशिव कापगते, तुमेश कापगते, हेतराम कापगते, विलास कापगते, नामदेव कापगते, कर्णवीर खोब्रागडे, रेवलाल भिमटे, इंद्रकांता गजभिये, धर्मपाल बैस, नागसेन वैद्य, पृथ्वीराज बांबोळे, हिरेंद्र मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, किशोर वैद्य, मुनेश्वर वाळवे, रामू येसनसुरे, राजेश बांबोळे आदी सर्व सदस्यांनी केली आहे.
गावातील काही व्यक्तीने माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत ३० आॅक्टोबर २०१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितली. त्यात सन २०१७-१८ मध्ये मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरण करण्यात आले. त्यामध्ये कुशल काम सुरू असलेल्या ठिकाणी माहिती फलकावर दोन लाख ७४ हजार १७६ रूपये कामाची किंमत दर्शविलेली आहे. तसेच कुशल कामाची जाहिरात न काढता, निविदा न मागविता खोडशिवनी येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांना काम मंजूर करण्यात आले. त्यात त्यांच्याच नावे रक्कम उलच करण्यात आली आहे.
पण प्रत्यक्षात सदर कामात माती वाहतूक करण्यासाठी गावातील पाच ट्रक्टर्स २००० रूपये प्रति दिवस भाड्याने घेवून काम करण्यात आले. ट्रक्टर मालकांना रोजगार सेवक विलास उईके व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तथा सध्याचे उपसरपंच यांनी ९० हजार रूपये दिले. सदर माती वाहतूक कामात ९० हजार रूपये खर्च झाले असताना दोन लाख ७४ हजार १४६ रूपयांची उचल करून एक लाख ८४ हजार १७६ रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
याशिवाय अकुशल कामावर १५ लाख ५२ हजार ०२७ रूपयांचा खर्च दर्शविला आहे. त्यात कामावर न येणाºया व आपल्या जवळच्या काही मजुरांच्या बोगस हजेरी लावून हजारो रूपयांची उचल करण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार मनरेगा अंतर्गत कामावरील प्रत्येक मजुराचे बँक खाते असणे अनिवार्य आहे. मग प्रशासकीय अधिकाºयांनी कुशल कामावर दोन लाख ७४ हजार १७६ रूपयांची मोठी रक्कम कोणत्या आधारावर दिली. एकीकडे प्रत्येक मजुराला बँक खाते व आधार क्रमांकाची सक्ती तर दुसरीकडे लाखो रूपयांची देवाणघेवाण नगदी रक्कमेने करण्यात आली. माती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर मालकांना ९० हजार रूपये देण्यात आले.त्यामध्ये राजकुमार कापगते यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये, दिलीप डोंगरवार यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये, धनंजय कापगते यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये, नामदेव कापगते यांना १० दिवसांसाठी २० हजार रूपये व निलेश काशिवार यांना पाच दिवसांसाठी १० हजार रूपये यांना दिल्याची नोंद आहे.

Share