१ मे रोजी नागपुरातील विधानभवनावर फडकविणार विदर्भ राज्याचा झेंडा

0
9

गडचिरोली,दि.१५: भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट राज्य कर्जबाजारी झाले. त्यामुळे अशा कर्जबाजारी महाराष्ट्रात आम्हाला राहायचे नसून, येत्या १ मे रोजी नागपुरातील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकविणार असून, हा दिवस विदर्भ राज्य दिन म्हणून साजरा करणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राम नेवले यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, ही खूप जुनी मागणी आहे. विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने अनेकदा मोठमोठी आंदोलने केली. मात्र, १९९७ मध्ये पक्षाच्या कार्यकारिणीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव घेणाऱ्या भाजपची भूमिका आता बदलली आहे. आता ते ‘प्रथम विकास, नंतर विदर्भाचा विचार’ असे म्हणत आहेत. सरकार मौनीबाबा बनले आहे. या सरकारने रोजगार, महागाई, हमी भाव व अन्य कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, नोटाबंदीनंतर ३ लाख उद्योग बंद पडले आणि ३ कोटी ३ लाख लोकांना बेरोजगार व्हावे लागले, अशी टीका राम नेवले यांनी केली.

सरकारने नागरिकांची फसवणूक केली असून, महाराष्ट्र राज्यावर ४ लाख २३ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांमुळे हे कर्ज दुप्पट होणार आहे. त्यामुळे कर्जबाजारी महाराष्ट्रात राहण्याची वैदर्भीय जनतेची इच्छा नाही. त्यासाठी १ मे रोजी सकाळी संपूर्ण विदर्भातून हजारो नागरिक नागपुरातील यशवंत स्टेडियमवर एकत्र येतील. तेथून विदर्भ मार्च काढून विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवतील, असे राम नेवले यांनी सांगितले.

१ मेची लढाई ही आरपारची लढाई असून, सरकारने सार्वत्रिक निवडणुकीच्या सहा महिने आधी विदर्भ राज्याची घोषणा करावी, अन्यथा उत्तरप्रदेश व बिहारमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची जी गत झाली, तशीच गत विदर्भातही होईल, असा इशारा श्री.नेवले यांनी दिला.