संभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा…

0
10

मुंबई दि.१५:-  कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेला पोलिसांनी बुधवारी अटक केली. मात्र या प्रकरणातील अन्य एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर  अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईसाठी  भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे यांना येत्या २६ मार्चपर्यंत अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” कोरेगाव-भीमा येथे झालेला हिंसाचार भडकवण्यामध्ये मिलिंद एकबोटे यांच्याप्रमाणेच संभाजी भिडे यांचाही हात आहे. त्यामुळे मिलिंज एकबोटे यांच्यासोबतच संभाजी भिडे यांनाही येत्या २६ मार्चपर्यंत अटक करण्यात यावी. जर २६ मार्चपर्यंत भिडे यांना अटक झाली नाही तर कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोनातर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येईल.”
दरम्यान,मिलिंद एकबोटे याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयातने गुरूवारी (15 मार्च) रोजी हा निर्णय दिला. कोरेगा भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप ठेवत बुधवारी (14 मार्च) मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली होती. मिलिंद एकबोटेचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याला अचक केली. अटकेनंतर गुरूवारी सकाळी मिलिंद एकबोटेला न्यायालयात हजर करण्यात आले.
पुणे सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. पण उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.