जागतिक जल दिनानिमित्त राज्यभरात जलजागृती

0
43

 अर्चना शंभरकर/मुंबई, दि.18: पाणी आणि त्याचा मर्यादित असलेला साठा हा जागतिक चिंतनाचा विषय आहे. या विषयावर सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जगभरात साजरा होत असतो. सन 1993 पासून संयुक्त राष्ट्राने हा जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात केली. याच दिनाचे औचित्य साधून राज्यात गेल्या तीन वर्षांपासून जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या वर्षी ‘पर्यावरणासाठी पाणी’ ही थीम आहे. दि. 16 मार्च ते 22 मार्च या सप्ताहात राज्यस्तरावर, विभागस्तरावर, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामार्फत जलजागृती उपक्रम राबविले जात आहेत.

पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबधी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत समाजात जागृती आणी साक्षरता निर्माण होण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जलसंपदा विभाग,कृषी विभाग, पाणी पुरवठा विभाग, नगर विकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या संयुक्त समन्वयाने राज्यभर जल जागृती कार्यक्रम साजरा केला जात आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा या तीनही स्तरावर जनजागृतीसाठी कार्यशाळा व मेळावे आयोजित केले जात आहेत. ज्यामध्ये लोक प्रतिनीधी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. शाळा महाविद्यालयांमधून रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, चित्रफीत तयार करणे या सारख्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. यात
राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
निसर्गातील पाण्याच्या साठ्याचे संपत्ती म्हणून जतन करावे कारण आपण जतन करून ठेवलेली ही जलसंपत्ती पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडणार आहे. ‘जल है तो कल है’ हा संदेश घराघरात पोहचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न होत आहे.राज्यात जलजागृती सप्ताह हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.