कासा-किन्ही- कटंगटोलातील पुरग्रस्तांचा विषयावर चर्चा

0
8

गोंदिया,दि.24: तालुक्यातील किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या विषयाला घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व मंत्रालयातील संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी राज्य शासन व शासनातील अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा हा विषय पुरजोरपणे मांडला.
बैठकीत आमदार अग्रवाल यांनी नामदार पाटील यांना राज्य शासनाने गोंदिया जिल्ह्याला लावारीस सोडल्याचे सांगत येथील जिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदार आवश्यक कामांना पूर्ण करण्याप्रती उदासीन असल्याचे सांगीतले. ग्राम कासा व कटंगटोला येथे भूमी अधिग्रहण झाले असून मागील ८-१० वर्षांपासून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर ग्राम किन्ही येथे भूमी अधिग्रहणाचे काम करण्यास असमर्थ ठरत असल्याचे सांगीतले. तर सरकारही पुरग्रस्तांच्या पुनवर्सनाप्रती उदासीन असल्याचेही आमदार म्हणाले.
त्याचप्रकारे, मे २०१६ मध्ये आलेल्या वादळीवाऱ्यात सुमारे चार हजार नागरीकांना फटका बसला. तहसीलदारांनी तीन हजार ५०० लोकांची यादी शासनाला सादर केली. दिड वर्षे चक्कर मारल्यानंतर व शासनाने १० शासन निर्णय काढल्यानंतर २.७० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र ५०० नुकसानग्रस्त वंचीत असून त्यांच्यासाठी पुन्हा चक्कर माराव्या लागत असून गैरजबाबदार अधिकाºयांवर मात्र काहीच कारवाई झाली नाही. शिवाय त्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठीही काहीच कारवाई झाली नसल्याचेही आमदार अग्रवाल यांनी नामदार पाटील यांना सांगत आपली नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीही नामदार पाटील यांच्यापुढे मांडत पाणी व चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली.
आमदार अग्रवाल यांची नाराजी ऐकूण पाटील यांनी, उपस्थित अधिकाऱ्याना चांगलेच खडसावले. तसेच मदत व पुनर्वसन सचिव डॉ. मेघा गाडगीळ यांना पुर व नुकसानग्रस्तांच्या विषयांवर प्रस्ताव तयार करून शिफारसीसह मुख्यमंत्र्यांकडे अंतीम मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्याना दिले. दुष्काळात पाणी पुरवठा व चाºयाची कमी होऊन काही प्राणहानी झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.