आदिवासी अध्यासन:राज्यपाल कार्यालयाचे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र

0
14

गडचिरोली, दि.२५:  गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याची मागणी कवी प्रभू राजगडकर यांनी राज्यपाल तथा कुलपतीकडे एका पत्राद्वारे केली होती.त्या पत्राची दखल राज्यपालांनी घेतली असून त्यांच्या सचिवांनी गोडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना एक पत्र पाठवित पुढील कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे.

गोंडवाना विद्यापीठ असलेल्या भागात बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती, मानवी व्यवहार व आधुनिकता, तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना आणि त्यांच्यात अवगत असलेल्या विविध कला यांचा शास्त्रीय अभ्यास व्हावा आणि त्याविषयीची संधी महाराष्ट्रासह जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी अध्यासन’ सुरु करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे या महिन्याच्या सुरुवातीला एका पत्राद्वारे केली होती.

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु केल्यास त्याचे कोणते फायदे होतील, याविषयी प्रभू राजगडकर यांनी विस्तृतपणे पत्रात लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत राज्यपालांच्या सचिवालय कार्यालयातील अवर सचिव प्र.प्रां.लुबाळ यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठविले आहे. अध्यासन निर्मितीचा विषय आपल्या अख्त्यारित असल्याने राजगडकर यांच्या पत्राच्या अनुषंगाने योग्‍य कार्यवाही करावी, असे अवर सचिवांनी आदेशित केले आहे. त्यामुळे आता कुलगुरुंच्या पुढील कार्यवाहीकडे आदिवासी साहित्यिक, अभ्यासक व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे.