ताडोबातील माया वाघिणीची ‘माया’ कॅमेराबद्ध

0
9

चंद्रपूर दि.२६ :उन्हाळयात पाणी टंचाईमुळे पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गर्दी होत असून तिथे व्याघ्रदर्शनही होत आहे. ताडोबातील माया वाघिणीची माया कॅमेराबद्ध झाली असून आपल्या २ बछड्यांसह तिने पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले आहे. पाण्यातील बगळ्यांसोबतच्या मायाच्या बछड्यांच्या खेळामुळे पर्यटकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
सध्या वनक्षेत्रात पानगळीचे दिवस आहेत. परिणामी यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगलातील वन्यजीव दर्शनाची शक्यता वाढली आहे. सध्या ताडोबातील वाघिणीच्या लीलांनी पर्यटक खुश झाले आहेत. ताडोबातील प्रसिद्ध असलेली माया वाघीण सध्या आपल्या २ बछड्यांना घेऊन फिरताना दिसत आहे. वनविभागाच्या दफ्तरी टी-१२ नावाची नोंद आहे. तिचा सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून माया वाघीण आपल्या २ बछड्यांसोबत पाणवठ्यावर दर्शन देताना दिसत आहे. उन्हाळयात पाणी टंचाईमुळे पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गर्दी असते. अशातच पाणवठ्यावर आलेल्या बगळ्यांसोबतचा बछड्यांचा खेळ पाहून पर्यटक खुश होत आहेत. माया वाघीण ताडोबातील सर्वाधिक प्रसिद्ध वाघीण असून तिचे मायाळू चित्र टपालतिकिटावर कोरले गेले आहे.