मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचे निमंत्रण

0
12

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.26– कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने मुंबईत एल्गार मोर्चा काढला आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली आहे मात्र, मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली आहे. दरम्यान, पोलिस आणि आंदोलक यांच्यात आझाद मैदानात बाचाबाची झाली. प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात पोहचले असून, हजारोंची संख्येने आंदोलक मोर्चासाठी पोहचले आहेत. संभाजी भिडेंना अटक होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे.मुख्यमंत्र्याचे चर्चेचे निमंत्रण स्विकारत आंबेडकर शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला की, सरकार संभाजी भिडेंना वाचवते तसेच त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांना अटक करत नाही. संभाजी भिडे दोषी आहेत की नाही हे ठरविणारे सरकार कोण? असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, भिडे दोषी आहेत की नाहीत हे पोलिसाचा अहवाल आणि कोर्ट ठरवेल, सरकार नावाच्या यत्रंणेने यात हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नाही. यापुढे सरकार व नरेंद्र मोदींविरोधातील लढाई आणखी तीव्र करू, असे आंबेडकर म्हणाले.