दुय्यम निंबधक कार्यालयातील सर्वच जण अडकले एसीबीच्या जाळ्यात

0
5

कोल्हापूर(विशेष प्रतिनिधी),दि.२९:लाच स्वीकारणे हा कायद्यान्वये गुन्हा असला, तरी दररोज कुणी ना कुणी लाच स्वीकारताना सापडतोच. साधारणत: एक किंवा क्वचित प्रसंगी दोघे जण एसीबीच्या जाळ्यात अडकतात. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचारी एकाच वेळी लाच घेताना सापडले.तेही केवळ पाचशे रुपयांसाठी. एसीबीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याचे पन्हाळा तालुक्यातील धनगरवाडा येथील मित्र तानाजी रामू जानकर यांची गट क्रमांक ५३४ मधील ४ गुंठे जमीन तक्रारकर्ता खरेदी करणार होता. खरेदीकरिता नेमका किती खर्च येतो, हे विचारण्यासाठी तक्रारकर्ता हा २७ मार्च २०१८ रोजी पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेला. त्याने दुय्यम निबंधक यशवंत चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी चव्हाण यांनी तक्रारकर्त्यास शासकीय खर्चाची माहिती देऊन आणखी १५०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील कारकून श्रीमती बोटे, शिपाई प्रकाश सनगर, खासगी इसम शहाजी पाटील, संगणक ऑपरेटर सुशांत वनिरे व नितीन काटकर यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने प्रत्येकाची भेट घेतली असता त्यांनी सर्वांना प्रत्येकी ५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. नितीन काटकर याने १५०० रुपयांची मागणी केली. अशाप्रकारे सर्वांनी ५००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ते ३५०० रुपये स्वीकारण्यास तयार झाले. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी २८ मार्चला पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात  सापळा रचला. यावेळी दुय्यम निबंधक श्री.चव्हाण, कारकून श्रीमती बोटे, शिपाई प्रकाश सनगर, खासगी इसम शहाजी पाटील, संगणक ऑपरेटर सुशांत वनिरे व नितीन काटकर यांनी तक्रारकर्त्याकडून ३५०० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. यावरुन एसीबीने उपरोक्त सहाही जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले.

एसीबीचे पोलिस उपायुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार श्यामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, रुपेश माने व पाटील यांनी ही कारवाई केली.