आसोला गावासाठी नागपुरात किडनी परिषदेचे आयोजन

0
9

विदर्भातील नामवंत किडनीविकार तज्ञांचा सहभाग
यवतमाळ,दि.28 : नेफ्रॉलॉजी सोसायटी नागपुरच्या वतीने दि.१ एप्रील रोजी चिटणीस केंद्र नागपुर येथे किडनी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ तालुक्यातील आसोला गावाला केंद्रस्थानी ठेऊन या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला विदर्भातील नामवंत किडनीविकार तज्ञ सहभागी होणार आहे. आसोला गावातील हि गंभीर समस्या पुढे आणुन या आजाराचे रोगी शोधणे व त्यांच्या उपचारासाठी पुढाकार घेणारे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांना या परिषदेमध्ये विशेष अतिथी म्हणुन निमंत्रित करण्यात आले आहे.
या किडनी परिषदेला नेफ्रॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समिर चौबे, सचिव डॉ. मनिष बलवाणी, डॉ.निखिल किबे, डा.एस.जे.आचार्य, डॉ.सदानंद भुसारी, डॉ.प्रकाश खेतान, डॉ.अश्विनीकुमार खांडेकर, डॉ.सुनिल देशपांडे, डॉ.धनंजय उखळकर, डॉ.टी.सी.राठोड, डॉ.व्हि.एल.गुप्ता, डॉ.धनंजय राजे मार्गदर्शन करणार आहेत. उल्लेखनिय म्हणजे नागपुर येथिल किडनी परिषदेनंतर यवतमाळ येथेही याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आसोला गावातील या समस्येचे गांभिर्य लक्षात आल्यावर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने धाव घेऊन ग्रामस्थांना धीर देत तपासणी व उपचारासाठी पुढाकार घेतला. यवतमाळ जिल्ह्यात सध्या पाणी समस्येने थैमान घातले आहे. पाणी साठे प्रचंड खोल गेले आहेत. त्यामुळे अशुद्ध पाणी हि संपुर्ण जिल्ह्याची समस्या झाली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील इतर भागांमध्येही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो का यावरही विचारमंथन या परिषदेत करण्यात येणार आहे. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या पुढाकाराने नेफ्रॉलॉजीस्ट असोसीएशन व असोसीएशन ऑफ फिजीशीयन ऑफ इंडीया यांनी यवतमाळ जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून या समस्येवर उपाययोजना करण्याची विनंती केली होती.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या पुढाकाराने आचार्य विनोबा भावे ग्रामिण रूग्णालयात आसोला येथिल ३४ रूग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच डॉ. विजय मुन यांच्या साईश्रद्धा हॉस्पीटलच्या मार्पâत ५० रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २९ रूग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथिल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यामध्ये १३ रूग्ण किडनीच्या आजाराने बाधीत असल्याचे आढळून आले. आसोला गावावर कोसळलेल्या या संकटाच्या वेळी डॉ.धनंजय उखळकर, डॉ.टि.सी.राठोड, डॉ.अविनाश चौधरी, डॉ.अभ्युदय मेघे, डॉ.विजय मुन यांनी मोलाचे योगदान दिले त्याबद्दल शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने त्यांचे स्वागत केले आहे.