महाराष्ट्रातील ३ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

0
14

नवी दिल्ली,दि.03 : महाराष्ट्रातून उद्योजक रामेश्वरलाल काबरा, प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी आणि चित्रपट दिग्दर्शक सिसीर मिश्रा यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्‍या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पद्म पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्‍या व अंतिम टप्प्यात देशातील विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले. व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री रामेश्वरलाल काबरा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.काबरा यांनी ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी ‘फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी’ च्या माध्यमातून ३० हजार एकल विद्यालये स्थापित करून ८ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे.
बहुआयामी कलावंत मनोज जोशी यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री.जोशी हे गुजराती, मराठी व हिंदी रंगभूमी, टीव्ही व चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंत आहेत. ‘चाणक्य’ च्या भूमिकेसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत.प्रसिद्ध दिग्दर्शक सिसीर मिश्रा यांना कला व चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री.मिश्रा ७० च्या दशकात मुंबईत आले, त्यांनी भीगी पलके, समय की धारा, बिल्लु बादशाह, टाडा, असीमा आदि हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले. श्री.मिश्रा यांचे ओडिया चित्रपटामध्ये मोलाचे योगदान राहीले आहे.
गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ८४ मान्यवरांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ११ मान्यवरांचा समावेश आहे, पैकी ३ जणांना आज सन्मानित करण्यात आले. दिनांक २० मार्च २०१८ रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील ७ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.