पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद

0
199

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.03- जम्मू- काश्मीरमधील कृष्णा खोर्‍यात सीमारेषेवर पाकिस्तानी लष्काराने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील जवान शहीद झाला आहे. शुभम सुर्यकांत मुस्तापुरे (वय-20) असे शहीद जवानाचे असून ते महाराष्‍ट्रातील परभणी जिल्ह्यातील कोनरेवाडी येथील रहिवासी होते. या गोळीबारात एका अधिकार्‍यासह तीन जवान जखमी झाले आहेत.सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा खोर्‍यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात जवान शुभम सुर्यकांत मुस्तापुरे हे शहीद झाले.शुभम यांच्या पश्चात आई सुनीता असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम हे लष्करातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असे लष्कराने म्हटले आहे.

बुधवारी होणार अंत्यसंस्कार

शुभम यांचे पार्थिव उद्या सकाळी जम्मूवरु लष्कराच्या विशेष विमानाने औरंगाबाद येथे सकाळी 10 वाजता दाखल होईल. त्यानंतर हेलिकाॅप्टर ने परभणीला रवाना होईल. शासकीय इतमामात त्यांच्यावर कोनेरवाडी गावात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.