खमारीत दारू दुकानासमोरच पेटवली दारूची होळी 

0
18
गोंदिया,दि.08ः-वर्षभरापासून बंद असलेले देशी दारूचे दुकान पुन्हा सुरू होत असल्याची माहिती मिळताच जवळच्या खमारी येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी संताप व्यक्त करीत गावातील शेकडो महिलांच्या सहकार्याने थेट दारू दुकान गाठत दुकानात विक्रीसाठी आणलेल्या दारूच्या पेट्यांनाच आग लावल्याची घटना शनिवारी ७ एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी संबधी घोषणा करत गोंदिया – आमगाव या मुख्यमार्गावर बंद असलेल्या देशी दारू दुकानासमोरच दारूची एक प्रकारे होळीच पेटविल्याचे दृश्य होते. ही घटना मुख्यमार्गावर असल्याने या मार्गावरून ये-जा करणाèयांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
दारूमुळे संसाराची राखरांगोळी झाली. नवरा घरी दारू पिऊन आला की भीती वाटते. आज मार तर नाही खावा लागेल ना, घरात काय तमाशा होईल, याची चिंता लागली असते. त्यामुळे या दारूपासून मुक्ती मिळावी यासाठी खमारी येथील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदी समितीची स्थापना केली. तर समितीची नोंदणीही संबंधित विभागाकडे करून घेतली, अशात गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी महिलांनी एल्गार पुकारात गावातील अवैध दारू विक्री बंद केली.यासाठी मागील वर्षी २५ एप्रिल २०१७ रोजी तसा ठराव घेण्यात आला.अशातच मुख्यमार्गावरील दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश आले असता एन. डी. मेश्राम यांचे परवाना धारक देशी दारूचे दुकानही बंद करण्यात आले.त्यामुळे गावात शांतता नांदू लागली,असे असतानाच शनिवार 7 एप्रिलला अचानक गावातील मुख्यमार्गावरील बंद असलेले दारूचे दुकान सुरू होत असल्याची माहिती दारूबंदी समिती व गावातील इतर महिलांना मिळाली. आणि महिलांमध्ये संतापाची ठिणगी पेटली. ताबडतोब सर्व महिला एकवटत गावातच्या मुख्य चौकात एकत्र आल्या सुमारे दोनशे महिलांनी येथे सुरू होत असलेल्या दुकानावर हल्लाबोल करत सर्व महिलांनी मिळून दुकानात विक्रीसाठी आणलेल्या दारूच्या पेट्यांना आग लावली.यावेळी दारूबंदी समितीच्या विजू उके, कुसूम वलथरे, संतकला बोरकर, माजी सरपंच विमल तावाडे, वनमाला उके, भाग्यश्री लांडेकर, लक्ष्मी भालाधरे, प्रभा मेंढे यांच्यासह सुमारे दोनशे महिला यात सहभागी झाल्या होत्या.
खमारी गावात महिलांनी दारूबंदीला एल्गार करत मुख्यमार्गाला लागूनच दारूची होळी पेटवल्याची घटना घडली  असताना मात्र पोलिसांना घटना स्थळावर येण्यास उशीर झाल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे खमारी हे गाव गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असून पोलिस ठाण्यापासून हे गाव २ ते ३ किमीच्या अंतरावर आहे. अशात एवढी मोठी घटना होऊनही व गावात तणावरची स्थिती निर्माण झाली असताना पोलिस उशिरा पोहचल्यामुळे अनेक चर्चांना पेव फूटले होते.