पे अँड पार्किंगचा मुद्दा पेटला आमदार राणा समर्थकांचा हल्लाबोल

0
6

अमरावती,दि 10( विशेष प्रतिनिधी): अमरावती महापालिकेने राजकमल उड्डाणपुलाखाली सुरू केलेल्या पे अँड पार्किंगचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनपाच्या या नव्या धोरणाविधात आमदार रवी राणा यांचे समर्थक युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यानी मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करून संताप व्यक्त केला. पार्किंगची व्यवस्था सांभाळणाऱ्या कंत्राटदाराजवळील पावस्तीपुस्तके जाळून माहितीची फलके देखील जाळण्यात आली.
शहरातील मालवीय चौक ते राजापेठ मार्गावरील उड्डाणपुलाखाली मनपाने पे अँड पार्किंग सुरू केले आहे. यामुळे उड्डाणपुलाखाली वाहने उभी करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकास प्रत्येक तासाप्रमाणे पैसे मोजावे लागत आहे. या योजनेस शहरात विरोध वाढत आहे. महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. भाजपच्याच अंबा मंडलच्या वतीने सोमवारी पे अँड पार्किंग विरोधात आयुक्त हेमंत पवार यांना निवेदन देण्यात आले होते. यामुळे भाजपची कोंडी झाली असतांना आता आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यानी उग्र आंदोलन केले. दुपारच्या सुमारास कार्यकर्ते राजकमल चौक येथे पोहोचले. त्यांनी पे अँड पार्किंग योजनेच्या कंत्राटदाराजवळील पावतीपुस्तके जाळली. कार्यकर्त्यानी पार्किंगचा नियम व रक्कम सांगणारी फाळके देखील जाळून टाकली. रांगेत वाहने उभी राहावी यासाठी दोरी बांधण्यात आदी होती ती देखील काढून टाकली. कार्यकर्त्यानी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शहर कोतवाली पोलीसांनी चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.