गोंदिया जिपतील साप्रविच्या कर्मचाऱ्यांचे मुकाअना कक्ष अधिकाऱ्याविरोधात निवेदन

0
8

 गोंदिया,दि.11- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकाऱ्याच्या जाचाळा कंटाळून या विभागातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्या कक्षअधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज (दि.11)  निवेदन दिले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोल, ग्रामविकास विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांना सुद्धा पाठविण्यात आले आहेत.

या निवेदनामध्ये सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी दिवाकर खोब्रागडे यांचेवर गंभीर स्वरूपाचे आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहेत. श्री खोब्रागडे या कार्यालयात रूजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देणे, अरेरावी करणे, दडपशाही मार्गाचा अवलंब करणे, कर्माचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून अडथळा करणे, व्यक्तिगत स्वार्थाच्या गोष्टी करवून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे, मानसिक त्रास देणे, कामाचे वाटप करताना भेदभाव करणे, आपल्या विभागातील लिपिकवर्गीय कामे ही आपल्या मर्जीतील अन्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून करणे, एखाद्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संबंधिताला भेटण्यास कार्यालयात आल्याचे कक्ष अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्या कर्मचाऱ्याला त्याच्या नातेवाईकासमोर जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देणे आदी कारणांमुळे या विभागातील कर्मचार्यांची मानसिकता काम करण्याची राहीली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या कक्ष अधिकाऱ्याची चौकशी करून त्याचेवर कार्यवारी करण्यात आली नाही, तर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या कक्ष अधिकाऱ्याचे अन्यत्र स्थानांतरण शक्य नसल्यास या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे अन्यत्र तातडीने स्थानांतरण करण्यात यावे. असे न झाल्यास त्या अधिकाऱ्याची अरेरावी अाणखी वाढण्याची शक्यता या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.