कर्जमाफीच एकमेव पर्याय : रघुनाथदादा पाटील

0
8
गोंदिया,दि.13 : राज्य शासनाने शेतकर्‍यांना सावरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सम्मान कर्जमुक्ती योजना जाहिर केली.  मात्र या योजनेपासून अनेक शेतकरी अद्यापही वंचित आहेत.  राज्यात कर्जमुक्ती साधन असून पर्याय नाही, तेव्हा  संपूर्ण कर्जमाफी हा एकमेव पर्याय असल्याचे मत शेतकरी संघटन सुकाणू समितीचे राज्यध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मांडले.
 शेतकरी जागृती यात्रेचे (दि.११) गोंदिया जिल्ह्यात आगमन झाले असता तालुक्यातील चुटिया येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाने संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर येत्या १४ मे रोजी संपूर्ण राज्यात जेलभरो आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती दिली. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकरित्या कमकुवत झाला आहे. त्यातच रासायनिक खतांचे वाढलेले दर व शेतमाल उत्पादन करतांना येणारा खर्च शेत पिकातून काढने कठीण झाले आहे. त्यासाठी शासनाने उत्पादन खर्चावर आधारात समर्थन मुल्य द्यावे तसेच कर्जमुक्ती हे साधन आहे, पर्याय नाही. त्या अनुषंगाने शेतकर्‍यावर कोणताही अनुचित प्रकार करण्याची वेळ येऊ नये, यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 सुकाणू समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात जनजागृती यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली. तालुक्यातील चुटिया येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी सुकाणू समितीचे गणेश काका जगताप, डॉ. किशोर ढमाडे, संजय नाना जगताप, प्रकाश चितळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, चंद्रकलाबाई तुरकर, रामू शरणागत, हिरालाल टेंभरे, रामेश्वर चौरागडे, घनश्याम चौधरी, रतन बघेले, हिरालाल गराकाटे, महेश परसगाये, बसंती राऊत, उत्तम भगत यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.