कामावर रूजू व्हा,अन्यथा पुनर्नियुक्ती देणार नाही

0
12
जिल्हा आरोग्य अधिकार्याचे फर्मान, कंत्राटी एनआरएचम कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
गोंदिया,दि.13 : जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचार्यांनी १० एप्रिलपासून अकराऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईस्तोवर कामबंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाने घेतल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमळली आहे.दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी आज १३ एप्रिल रोजी संपावर असलेल्या एनआरएचएमच्या कर्मचार्यांना कामावर रूजू व्हा, अन्यथा पुनर्नियुक्ती मिळणार नाही असे फर्मानच काढावे लागले. तेव्हा सदर कर्मचारी कामावर रूजू होतात किंवा नाही याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच कंत्राटी कर्मचार्यांनी मात्र आंदोलन सुरुच ठेवले आहे.
आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्तांनी राज्यातील अधिकारी कर्मचार्यांना पुढील पुनिर्युक्तीचा आदेश केवळ सहा महिन्याचे देण्यात यावे व पुनर्नियुुक्ती आदेश देण्याकरिता कामावर आधारीत गुणानुक्रमाचा वापर करण्यात यावा, असे आदेश निर्गमीत केले आहे. हा प्रकार अनेक वर्षाापासून सेवा देणार्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचार्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बुधवारपासून जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६६७ कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटित होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे यांच्या नेतृत्वात अर्चना वानखेडे, संचित मोटघरे,संजय दोनोडे,सपना खंडाईत यांच्यासह शकेडोवर कर्मचारी सहभागी झाले होते.